Russia Ukraine Tension : रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukrain Conflict) तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित करताना केलेल्या घोषणेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व युक्रेनच्या दोन स्वतंत्र प्रदेशांच्या स्वातंत्र्याला रशिया मान्यता देईल, असे पुतीन यांनी जाहीर केले आहे. रशिया डोनेस्तक आणि लुगांस्क या स्वयंघोषित प्रजासत्ताकांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुतिन यांनी डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) आणि लुगांस्क पीपल्स रिपब्लिक (एलपीआर) यांना मान्यता देण्यासंबंधीच्या कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी डीपीआरचे प्रमुख डेनिस पुशिलिन आणि एलपीआरचे प्रमुख लिओनिड पास्निक यांच्यासोबत करारावर स्वाक्षरी केली. रशिया आणि डीपीआर, एलपीआर यांच्यातील हा करार मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहाय्य यासंदर्भात आहे.
"ज्यांनी हिंसाचार, रक्तपात, अराजकतेचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली त्यांनी डॉनबासचा मुद्दा ओळखला नाही. डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक आणि लुगांस्क पीपल्स रिपब्लिकचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व ओळखले पाहिजे. आपण रशियन फेडरेशनच्या फेडरल असेंब्लीला या निर्णयाचे समर्थन करण्यास सांगू आणि त्यानंतर या देशांसोबत मैत्री आणि परस्पर सहाय्यासाठी दोन करार केले जातील. तसंच त्यासंबंधीची कागदपत्रे लवकरच तयार केली जातील," असं पुतिन म्हणाल्याची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिली. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेनंतर आता युक्रेनच्या या भागात रशियन सैन्य घुसण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
आधुनिक युक्रेनची निर्मिती"आधुनिक युक्रेनची निर्मिती पूर्णपणे रशियानं केली आहे. ही प्रक्रिया १९१७ च्या क्रांतीनंतर त्वरित सुरू झाली. बोल्शेविकच्या धोरणामुळे युक्रेनचा उदय झाला. त्याला आजही व्लादिमीर इलिच लेनिनचं युक्रेन असं ओळखलं जातं. ते याचे वास्तुकार आहेत. कागदपत्रांद्वारेही याची पुष्टी होते. युक्रेनमध्ये आता लेनिन यांची स्मारकं उद्ध्वस्त करण्यात आली. याला डिकम्युनायझेशन म्हणतात. तुम्हाला हवं आहे का? हे अयोग्य आहे. वास्तविक डिकम्युनायझेशनचा अर्थ काय असतो हे आम्ही युक्रेनला दाखवण्यास तयार आहोत," असंही त्यांनी नमूद केलं.