माॅस्को : युक्रेनच्या युद्धांमधील घडामोडींच्या झळकणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या हे फेसबुक बारकाईने तपासत आहे. त्यामुळेच रशियाने फेसबुकच्या सेवेवर निर्बंध लादले आहेत, असे फेसबुक संचालित करणारी कंपनी मेटाने म्हटले आहे.
बातम्या, पोस्टचा खरेखोटेपणा तपासणे फेसबुकने बंद करावे, असा आदेश रशियाने दिला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशिया आपली बाजू बळकट करण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत चाणाक्षपणे वापर करत आहे. रशियाच्या समर्थनार्थ फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर पोस्ट झळकविण्यात येत आहेत. युक्रेनची कशी हार होत आहे, याचे वर्णन या मजकुरात असते. त्या पोस्टमधील वस्तुस्थिती फेसबुक सातत्याने तपासून बघत असल्याने रशिया संतापला आहे.
रशिया, युक्रेनसाठी जहाजमार्गे होणारे मालवाहतूक बुकिंग बंद
कोलकाता : रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिपिंग लायनर्सनी (जहाजावरून माल पाठविण्याचे काम करणारे) बंदरावरील मालवाहतुकीचे बुकिंग बंद केले आहे. भारतातील इंजिनीअरिंगमधील निर्यातीसाठी रशिया प्रमुख ठिकाण आहे.
ज्या मालवाहतुकीसाठी अगोदरच कंत्राटे मिळाली आहेत, अशी निर्यात या निर्णयामुळे ठप्प होणार आहे. पश्चिम बंगाल कस्टम हाउस एजंट्स सोसायटीचे अध्यक्ष सुजित चक्रवर्ती यांनी सांगितले की, या दोन देशांतील अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे. इंजिनीअरिंग उत्पादक निफा एक्सपोर्टचे संचालक राकेश शाह यांनी सांगितले की, आमच्या कंपनीकडे रशियासाठीची ऑर्डर आहे. मात्र, कंटेनर बुकिंग बंद झाले आहे.