युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध पेटले आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत युक्रेनने रशियासोबत चर्चा (Russia-Ukraine Talks) करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. खरेतर, राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक (Mykhailo Podoliak) यांनी म्हटले आहे, की कीव न्यूट्रॅलिटी (Neutrality) संदर्भात युक्रेन रशियासोबत बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, त्याला सुरक्षेची हमी मिळायला हवी.
युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे संपूर्ण देशातच भीतीचे वातावरण आहे. यातच चेरनोबिल भागावर आधीच रशियाने कब्जा केला आहे. आता रशियन सैन्य कीवच्या दिशेने आगेकूच कत आहे. अशी स्थिती असताना युक्रेनचे जवान राष्ट्रीय राजधानीच्या वायव्य भागात रशियाच्या फौजांचा सामना करत आहेत. या लढाईत, कीवपासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर वायव्येकडे असलेल्या इव्हान्कीव्ह येथे नदीवरील एक पूल शुक्रवारी सकाळच्या सुमारास नष्ट झाला आहे.
युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराशेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले की, "आजचा दिवस सर्वात कठीण असेल." कारण रशियाची योजना टँकच्या सहाय्याने इव्हान्कीव्ह आणि चेर्निहाइव्ह मार्गे कीवमध्ये प्रवेश करण्याची आहे. आमच्या ATGM (Anti Tank Guided Missile)च्या सहाय्याने रशियन टँक जळून राख होतात. रशियाने काल युक्रेनवर जबरदस्त मिसाइल हल्ले चढवले होते.