नवी दिल्ली - युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनशिवाय युरोपीय संघातील देशांसोबतचे रशियाचे वैर जगजाहिर आहे. आता रशियाने शत्रू साष्ट्र म्हणून आणखी 4 देशांची यादी जाहीर केली, असा मोठा दावा चिनी माध्यमांनी केला आहे.
EU देशांच्या नावांचा समावेश - चीनच्या CGTN ने ट्विट करत म्हटले आहे की, रशियाने शत्रू देशांची एक यादी जारी केली आहे. या यादीत युक्रेनशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि जपानचेही नाव आहे. याशिवाय, EUच्या सर्व 27 सदस्य देशांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर नाराज आहेत.
रशियावर लादण्यात आले आहेत निर्बंध -रशियाने तयार केलेल्या या यादीत कॅनडाचाही समावेश आहे. याच बरोबर, EUच्या सदस्यांशिवाय, स्वित्झर्लंड, अल्बेरिया, आइसलँड, नॉर्वे, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि तैवान यांनाही रशियाने मित्र नसलेल्या देशांच्या यादीत टाकले आहे. हे सर्व असे देश आहेत, ज्यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचे निर्बंध लादले आहेत.
न्यूझीलंडने पुतिन यांच्यासह रशियातील 100 लोकांवर घातली बंदी -रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यातच आता न्यूझीलंडनेही (New Zeland) एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासह 100 महत्त्वाच्या व्यक्तींवर बंदी घातली आहे. या यादीत रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचाही समावेश आहे.