विश्वंभर साकोरे (थेट युक्रेनमधून)/ शब्दांकन- भानुदास पऱ्हाड
खारकीव्ह : खारकीव्ह (kharkiv) शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियन फौजांनी (russian forces in ukraine) हल्ले तीव्र केले आहे. रशियन क्षेपणास्त्रे येथील शासकीय इमारती आणि नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहेत. मी आणि माझ्यासारखे शेकडो भारतीय विद्यार्थी या शहरात अडकलो आहोत (indian student stuck in ukraine). एका बंकरमध्ये आम्ही लपून आहोत. २४ तासांपासून अन्नाचा एक कणही आमच्या पोटात गेलेला नाही. रशियन बॉर्डर आमच्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असल्याने एवढ्या दूर तेथे जाणे आम्हाला शक्य नाही. भारतीय दूतावासाने आम्हाला ताबडतोब हे शहर सोडायला सांगितले मात्र, अद्यापही आम्हाला कुठलीही मदत दूतावासाकडून मिळालेली नाही.
मी विश्वंभर प्रकाश साकोरे, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथील आहे. एमबीबीएस शिक्षणासाठी मी गेल्यावर्षीच येथे आलो. सुरुवातीचे दिवस छान गेले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांचे संबंध ताणले गेले. यातून चर्चेतून तोडगा निघेल असे वाटले मात्र, तसे झाले नाही. आज चारही बाजूंनी रशियन फौजांनी युक्रेनवर हल्ले सुरू केले आहे. मी खारकीव्ह या महत्त्वाच्या शहरात आहे. शिक्षणाची पंढरी असलेल्या या शहरावर चारही बाजूंनी क्षेपणास्त्रांनी हल्ले होत आहे. मी आणि माझ्यासारखे ९०० हून अधिक भारतीय विद्यार्थी आम्ही या शहरात अडकलो आहे. आम्हाला तातडीने युक्रेन सोडायला सांगितले. मात्र, आमची जाण्याची कुठलीही सोय भारतीय दूतावासाने केली नाही. सहा दिवसांपासून आम्ही खारकीव्ह शहरात आमचा जीव मुठीत घेऊन लपून बसलो आहोत. आम्हाला रशियन सीमांमधून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ती सीमा खारकीव्हपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यात धुमश्चक्री सुरू आहे. बॉम्बहल्ले, क्षेपणास्त्र गोळीबार यातून आम्हाला एवढ्या दूर तेथे जाणे शक्य नाही. गेल्या २४ तासांपासून आम्ही अन्न-पाण्यापासून वंचित आहोत. क्षेपणास्त्रांच्या भीतीने आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. दूतावासाने आम्हाला शहर साेडण्यास सांगितले. मात्र, आम्हाला बाहेर पडण्यास कुठलीही मदत दिली गेली नाही. आम्ही सर्व विद्यार्थी भारतीय दूतावासाकडून लवकरात लवकर मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत.
स्थानिकांनाच रेल्वेतून प्रवास; आम्हाला मारहाण
खारकीव्ह शहरातून बाहेर पडण्यासाठी स्थानिकांसह परदेशी विद्यार्थ्यांची झुंबड रेल्वे स्थानकावर झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रेल्वेत बसू दिले जात नसून मारहाणही होत आहे. रेल्वेतील काही जागा मोकळ्या असतात. मात्र, स्थानिक पोलीस भारतीय विद्यार्थ्यांना रेल्वेत बसून देत नाहीत. मोजकेच विद्यार्थी रेल्वेत बसण्यास यशस्वी हाेत आहे. आम्ही आमचा धीर कसाबसा टिकवून आहोत. मात्र, विद्यार्थिनींची अवस्था बिकट आहे. जे विद्यार्थी प्रवासात आहेत ते जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. भारतीय दूतावास विभागाने आम्हाला तत्काळ किमान सीमेवर पोहोचविण्याची बसेसची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
सहा तासांचा कॉरिडॉर नावालाच
मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्या शहरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. भारताने राजनयाच्या माध्यमातून रशियन फौजांकडून ६ तासांचा कॉरिडॉर मिळाला. मात्र, हा कॉरिडॉर नावालाच राहिला. या वेळेचा फायदा घेऊन आम्हाला तातडीने बस, रेल्वे किंवा मिळेल त्या माध्यमाने शहराच्या बाहेर काढणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही आहे त्याच ठिकाणी अन्न-पाण्याशिवाय अडकून पडलो आहोत.