किव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. अशातच एक वेगळीच बाब समोर आली आहे. सततच्या युद्धाला कंटाळून एका कुटुंबाने अफगाणिस्तान सोडून युक्रेनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, वर्षभरातच युक्रेन येथेही युद्ध सुरू झाले. या कुटुंबाला पुन्हा एकदा स्थलांतरित व्हावे लागत असून, हे नशिबाचे भोग असल्याचे सांगितले जात आहे.
तालिबानने अफगाणिस्तावर हल्ला करत संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच्या या घटनेनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. अफगाणिस्तानमधील सततच्या युद्धाला कंटाळून युक्रेन येथे स्थायिक झालेल्याचे नाव अजमल रेहमानी असून, आता युक्रेनमधूनही स्थलांतरित व्हावं लागलंय. पोलंडमध्ये स्थलांतरित होणाऱ्या हजारो युक्रेनियन नागरिकांमध्ये अजमलचाही समावेश आहे.
अफगाणिस्तामधील सर्वकाही विकून युक्रेनला स्थायिक
यापूर्वी माझे आयुष्य अफगाणिस्तानमध्ये निवांत सुरु होते. माझे स्वत:चे घर होते, गाडी होती आणि पगारही चांगला होता. मी माझी गाडी, घर आणि सर्वकाही विकून इथे आलो आणि इथे ते सारे आता गमावून बसलो आहे. मात्र, माझे कुटुंब आणि त्यांच्या प्रेमापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. मी एका युद्धामधून पळालो आणि दुसऱ्या देशात आलो. तर इथे दुसरे युद्ध सुरु झाले. फार वाईट नशीब आहे माझे, अशी प्रतिक्रिया रेहमानीने दिली.
सात वर्षाची मुलगी, पत्नी आणि ११ वर्षांचा मुलगा
रेहमानीने दिलेल्या माहितीनुसार तो यापूर्वी १८ वर्ष अफगाणिस्तानमध्ये नाटोसाठी काम करत होता. तो काबुल विमानतळावर तैनात होता. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघार घेण्याच्या चार महिनेआधी रेहमानी त्याच्या कुटुंबियांसोबत अफगाणिस्तान सोडून युक्रेनमध्ये आला होता. सतत मिळणाऱ्या धमक्या आणि मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये या दोन मुख्य कारणांमुळे सर्वकाही विकून तो युक्रेनमध्ये स्थायिक झाला. रेहमानीसोबत त्याची सात वर्षाची मुलगी, पत्नी मिना आणि ११ वर्षांचा मुलगा ओमर हे पोलंडमध्ये निर्वासित म्हणून आलेत. हे चौघेजण पोलंडमध्ये येण्यासाठी जवळजवळ ३० किमीचे अंतर पायी कापून आलेत. युक्रेनमध्ये सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने त्यांनी चालतच युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, रेहमानीला अफगाणिस्तान सोडताना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्याला युक्रेन हा एकमेव पर्याय उपलब्ध होता आणि त्याने काहीही करुन अफगाणिस्तान सोडायचे ठरवून युक्रेनमध्ये आपला संसार थाटला. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ओडसा शहरामध्ये ते स्थायिक झाले. आता रेहमानी आणि त्याच्या कुटुंबाला विस्थापित म्हणून नोंदणी करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला जाणार आहे.