रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते रशियन महिला फ्लाइट अटेंडंट्स (एअर होस्टेस) आणि पायलट यांच्यासोबत दिसून येत आहेत. एका टेबलाभोवती अनेक महिला बसलेल्या आहेत आणि त्यांच्या सोबत राष्ट्रपती पुतीनही (Vladimir Putin) दिसत आहेत.
nypost.com च्या वृत्तानुसार, हा फोटो गेल्या शनिवारचा (5 मार्च) आहे. यात रशियन राष्ट्रपती Aeroflot एअरलाइनच्या महिला फ्लाइट अटेंडंट आणि पायलट्स यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. खरे तर, पुतिन PJSC Aeroflot च्या एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान ते रशियन एअरलाइन्सच्या महिला फ्लाइट क्रूसोबत दिसून आले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एअरलाइनच्या कर्मचाऱ्यासोबत एक बैठकही केली.
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे हे फोटो ABC चे रिपोर्टर Patrick Reevell (@Reevellp) यांनीही पोस्ट केले आहेत. पुतिन यांचे हे फोटो शेअर करताना त्यांनी, 'तर पुतिन आता टीव्हीवर रशियन ट्रेनी फ्लाइट अटेंडंट्सना युक्रेन हल्ल्याचे कारण समजावून सांगत आहेत,' असे लिहिले आहे.
दरम्यान, टीव्हीवर प्रसारित झालेल्या एका बैठकीदरम्यान, राष्ट्रपति पुतिन म्हणाले, 'पश्चिमेकडील देशांचे रशियावरील प्रतिबंध हे युद्धाच्या घोषणे समानच आहेत.' एवढेच नाही, तर युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लागू करण्याचा कुठलाही प्रयत्न युद्धात उतरण्यासमानच आहे, असा इशाराही पुतीन यांनी दिला आहे.