Russia-Ukraine Conflict: झुकणार नाही! युक्रेनच्या जेलेन्स्कींचे रशियाला प्रत्युत्तर, राजकीय पाठिंब्यासाठी मोदींना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:26 AM2022-02-27T05:26:18+5:302022-02-27T05:27:24+5:30
आम्ही रशियासमोर कदापिही झुकणार नाही, अशी रणगर्जना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे.
कीव्ह : आम्ही रशियासमोर कदापिही झुकणार नाही, अशी रणगर्जना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनच्या भूमीवर पाय रोवून आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही, असा संदेश लष्करी गणवेशातील जेलेन्स्की यांनी जनतेला एका व्हिडीओतून दिला. युक्रेनची राजधानी कीव्हच्या परिसरात असंख्य नागरिक हाती शस्त्रे घेऊन रशियन सैनिकांशी लढत आहेत.
जेलेन्स्की म्हणाले की, आम्ही युक्रेनचे प्राणपणाने रक्षण करू. शस्त्रे हेच आमचे सामर्थ्य आहे. युक्रेन सैन्याला मी शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितल्याच्या अफवा इंटरनेटवरून पसरविण्यात येत आहेत. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये. आम्ही आमची बायका-मुले, मातृभूमी या सर्वांचे रक्षण करू. जेलेन्स्की यांच्या ठाम भूमिकेमुळे युक्रेनच्या जनतेचे मनोधैर्य उंचावले असल्याचा दावा त्या देशाच्या सरकारने केला.
कीव्हपासून रशियाचे सैनिक सुमारे ३० कि.मी. दूर अंतरावर असून, त्यांना युक्रेनचे नागरिक व लष्कर कडवा प्रतिकार करत आहेत. कीव्ह परिसरातील रस्त्यांना आता रणभूमीचे स्वरूप आले आहे. कीव्ह व परिसरातील नागरिकांना युक्रेन सरकारने सुमारे ११ हजार बंदुका वाटल्या आहेत. युक्रेनमधील सुमारे ८०० लष्करी ठिकाणे नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. त्यात कमांड पोस्ट, विमान व क्षेपणास्त्रेविरोधी यंत्रणा, ४८ रडार केंद्रांचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)
युनोमधील ठरावाला रशियाचा व्हेटो; भारत तटस्थ
- रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे तसेच युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवावे, अशी मागणी करणाऱ्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या मतदानाला भारत, चीन, युएई हे अनुपस्थित राहिले. मात्र, या तिघांनी रशियाच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
- सुरक्षा परिषदेतील १५ सदस्यांपैकी अमेरिकेसह ११ देशांनी या ठरावाच्या बाजूने, तर रशियाने विरोधात मतदान केले. रशियाने या ठरावाविरोधात नकाराधिकार (व्हेटो) वापरून तो फेटाळून लावला. तरीही सुरक्षा परिषदेत रशिया एकटा पडला असल्याचे चित्र दिसले. पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात सुरक्षा परिषदेत अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती.
- संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी बैठकीत सांगितले की, युक्रेनमधील सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारत अतिशय अस्वस्थ आहे. तेथील हिंसाचार रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली जावीत. युक्रेनमधील हजारो भारतीयांच्या सुरक्षेचीही काळजी आम्हाला सतावत आहे. लोकांना जीवे मारून कोणत्याही समस्येवर तोडगा निघणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राजकीय पाठिंब्यासाठी जेलेन्स्कींचे पंतप्रधान मोदी यांना साकडे
रशियाने केलेले आक्रमण थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने आम्हाला राजकीय पाठिंबा द्यावा, अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना केली. यावेळी युक्रेनमधील जीवित व वित्तहानीबद्दल मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.
हिंसाचार थांबवून चर्चेद्वारे तोडगा काढावा, असे मोदी यांनी जेलेन्स्की यांना सांगितले. जेलेन्स्की यांनी दूरध्वनी संभाषणात मोदींना सांगितले की, युक्रेनचे लष्कर व जनता रशियाचा कडवा प्रतिकार करीत आहे. एक लाखाहून अधिक रशियन सैनिकांनी युक्रेनवर चढाई केली. रशिया युक्रेनमधील निवासी इमारतींवरही बॉम्बहल्ले करीत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे प्राण संकटात आले आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबविण्यासाठी भारतानेही कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जेलेन्स्की यांनी मोदींना केले.