Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा १३ वा दिवस आहे. रशियाचे युक्रेनच्या विविध भागांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. युद्ध थांबावे, यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. तसेच या गंभीर परिस्थितीतून आपापल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सुरू आहेत. या युद्धातून अजूनही रशियाला काहीही साध्य झालेले नाही. मात्र, तरीही विध्वंस सुरूच आहे. अशातच आता जागतिक बँकेने पुढाकार घेत युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड बँकेने युक्रेनला तब्बल ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.
एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे.
युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर
जागतिक बँकेने सांगितले की, त्यांच्या कार्यकारी मंडळाने युक्रेनसाठी ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचे कर्ज आणि अनुदानाचे पॅकेज मंजूर केले आहे. या पॅकेजमध्ये जागतिक बँकेच्या पूर्वीच्या कर्जासाठी ३५० दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज पुरवणीचा समावेश आहे. नेदरलँड आणि स्वीडनने हमी दिल्यानंतर यामध्ये सुमारे १३९ दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेने एका निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, कर्जाचे जलद वितरण युक्रेन सरकारला गंभीर सेवा प्रदान करण्यात, रुग्णालयातील कामगारांना पैसे देण्यास, निवृत्ती वेतन आणि सामाजिक कार्यक्रम सुरू ठेवण्यास मदत करेल, असे म्हटले आहे.
जागतिक बँक युक्रेनच्या पाठीशी
रशियन आक्रमणामुळे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि स्थानिकांना लोकांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँक गट जलद कारवाई करत आहे. जागतिक बँक समूह युक्रेन आणि प्रदेशातील लोकांच्या पाठीशी उभा आहे. या संकटाच्या दूरगामी मानवी आणि आर्थिक परिणामांना तोंड देण्यासाठी आम्ही उचलत असलेल्या अनेक पावलांपैकी हे पहिले पाऊल आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. याशिवाय, यात ब्रिटन, डेन्मार्क, लाटविया, लिथुआनिया आणि आइसलँडकडून १३४ दशलक्ष डॉलर्सचे अनुदान तसेच जपानकडून १०० दशलक्ष डॉलर्सच्या समांतर वित्तपुरवठा यांचाही समावेश आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २४ फेब्रुवारीला युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारले होते, तेव्हा आपले ध्येय हे युक्रेनवर कब्जा करणे नसून डिमिलिटराइज करणे असल्याचे त्यांनी सांगितले होते. रशियाने युक्रेनसमोर त्वरीत सैन्य कारवाई बंद करण्याची अटी ठेवल्या असून, आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.