Russia Ukraine Crisis : एजंटांमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांपुढे मोठ्या समस्या, प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 07:14 AM2022-02-26T07:14:22+5:302022-02-26T07:15:18+5:30
Russia Ukraine Crisis : भारतीय विद्यार्थी देतात एकमेकांना धीर.
पोपट पवार
Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना युक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवून देणारे एजंटच भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावर उठले आहेत. भारतात परतण्यासाठी या एजंटांनी अव्वाच्या-सव्वा पैशांची मागणी करत या विद्यार्थ्यांना खिंडीत गाठले आहे. याबाबत ‘लोकमत’ने युक्रेनच्या उझगोरोड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शार्दूल भागवत बाबर (मूळ गाव. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याबरोबर थेट संवाद साधला. यावेळी त्याने आपली आपबिती कथन केली.
शार्दूलने २०१७ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी उझगोरोड विद्यापीठात प्रवेश घेतला. सध्या तो एमबीबीएसच्या पाचव्या वर्षात आहे. भारतातील तब्बल ८०० विद्यार्थी या शहरात सध्या वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. भारतीय दुतावासांशी संपर्क होत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. अशातच पंजाब, उत्तर प्रदेश या भागातील युक्रेनस्थित एजंट या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मायदेशी सोडण्याचे आमिष दाखवत आहेत. प्रचलित विमान तिकीटापेक्षा तीन-चार पट अधिक दर एजंट सांगत आहेत. भारत सरकार आम्हाला मायदेशी नेण्यासाठी कोणती भूमिका घेत आहे, यावर आमची नजर असली तरी युद्धाच्या गडद छायेमुळे आमचाही धीर खचत आहे. परिणामी, अनेकजण एजंटच्या आमिषाला बळी पडल्याचे शार्दूल म्हणाला.
उझगोरोड सर्वांत सुरक्षित; पण...
हंगेरी अन् स्लोव्हाकियाच्या बॉर्डरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उझगो रोड शहरात युद्धाच्या झळा बसत नसल्या तरी युक्रेनवर उद्भवलेल्या संकटामुळे हे शहरही भीतीच्या सावटाखाली आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होत असल्याने नागरिक वस्तूंचा साठा करत असल्याचे शार्दूलने सांगितले.
आतापर्यंत माझा मुलगा देशात सुरक्षित होता; पण युद्धजन्य परिस्थितीमुळे भीती वाटू लागली आहे. सरकारने तिथे अडकलेल्या मुलांना त्वरित मायदेशी आणावे.
- डॉ. चंद्रकला बाबर, शार्दूलची आई