Russia Ukraine Crisis : बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:04 AM2022-02-25T06:04:38+5:302022-02-25T06:05:13+5:30

नागपूरच्या विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’, युक्रेनमधील भारतीय जीव मुठीत घेऊन काढताहेत एकेक क्षण. वाचा काय म्हणतायत विद्यार्थी.

Russia Ukraine Crisis Bombs destroyed buildings roads and mountains of smoke in the sky know what indian students saying | Russia Ukraine Crisis : बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’

Russia Ukraine Crisis : बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’

Next

आनंद डेकाटे 
नागपूर : युक्रेनच्या राजधानीपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या आमच्या शहरात बुधवारपर्यंत सारे काही सुरळीत होते; पण गुरुवारची पहाट भीतीदायक परिस्थिती घेऊन उगवली. सकाळपासूनच रशियन क्षेपणास्त्रांचे हल्ले आमच्याही शहरांवर सुरू झाले. क्षणोक्षणी परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. सर्वत्र बॉम्बच्या हल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर साचले आहेत. समोरच्या क्षणी काय होईल, या विचाराचा भयकंप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. कुठूनतरी मदत येईल या अपेक्षेने आम्ही सर्व भारतीय जीव मुठीत घेऊन एकेक क्षण काढत आहोत. 

युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या मूळच्या गोंदिया येथील व सध्या नागपुरात राहणारा पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र मांडले. पवन हा नागपुरातील धरमपेठ येथील रहिवासी असून, तो सध्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ताे इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरातील नॅशनल मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. दोन वर्षांपूर्वीच तो तिथे गेला. ‘लोकमत’ने संपर्क साधला असता पवनने सांगितले की, रशियाने आतापर्यंत अर्धे युक्रेन ताब्यात घेतले आहे. राजधानी किव्हपासून आमचे शहर ५०० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील जवळपास १२०० विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत.

संपूर्ण युक्रेनमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आमच्या शहरात तणावाचे वातावरण होतेच. आमचे शहर कालपर्यंत हल्ल्यापासून सुरक्षित होते; परंतु बुधवारी हल्ले झाले. स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाइप, जिथून विजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला केला आहे. सगळीकडे आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडे धूर दिसत आहे. एटीएममधून पैसे निघत नाहीत. सर्व विद्यार्थी घाबरलेले आहेत. 

‘इतकं महाग तिकीट कसं काढू?’
पवनने सांगितले की, भारतीय दूतावासाने २० तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमाने २२, २४ आणि २६ तारखेला उपलब्ध करून देण्यात आली. तिकीट प्रत्येकाने आपापले काढायचे आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो; परंतु आता ६० ते ८० हजार रुपये आकारले जात आहेत. इतके महाग तिकीट कसे काढणार?  

केंद्र व महाराष्ट्र सरकारला विनंती 
युक्रेनमध्ये सध्या सगळ्या फ्लाइट बंद झाल्या आहेत, इथे नो फ्लाइट झोन झाले आहे, त्यामुळे भारत सरकारने येथील लोकांना एअरलिफ्ट करावे, अशी विनंती पवनने केली आहे. यासोबतच त्याने महाराष्ट्र सरकारकडेही तिकिटांचे दर कमी करण्याची विनंती केली आहे. 

गोंदियातील तीन विद्यार्थ्यांची हाक

अंकुश गुंडावार 
गोंदिया : युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून त्यांनी मदतीची हाक दिली; पण त्यांना अद्याप कुठूनच मदत न मिळाल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंतासुद्धा वाढली आहे. 
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पवन मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र अशोक भोयर, मयूर मुनालाल नागोसे हे तिन्ही विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीवर युक्रेन येथे शिकायला गेले आहेत. ते तिघेही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला आहेत. 

अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने मोठी अडचण झाली आहे. तीन चार दिवसांपासून त्यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला.

विद्यार्थी रशियात; अकोलेकर चिंतेत

अतुल जयस्वाल
अकोला : रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युद्धाला सुरुवात झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता सतावत आहे. ‘लोकमत’ने थेट रशियातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. 

विद्यार्थी म्हणतात, आम्ही सुरक्षित
स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या अभिषेक मोडक या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यासोबत संपर्क साधला असता, तिकडे तूर्तास सर्व शांतता असल्याचे त्याने सांगितले. या युनिव्हर्सिटीमध्ये अकोल्याचे १५ ते २० विद्यार्थी शिकत असून, ते सर्व सुखरूप आहेत. युक्रेनच्या सीमेपासून व युद्धक्षेत्रापासून स्मॉलेंक्स ५०० कि.मी. लांब असल्याने तूर्तास कोणताही धोका नाही. 

माझा मुलगा अभिषेकशी रोजच मोबाईलवरून संपर्क होतो. तिकडे सर्व शांत असल्याचे तो सांगतो. परंतु हे ठिकाण युक्रेन सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने थोडी चिंता आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लाटेतही त्याच्या शिक्षणात अडथळा आला होता. 
सुनील मोडक, पालक, अकोला

भारतीय मुलींची परतीची वाट बिकट

कुंदन पाटील

जळगाव : युक्रेनमध्ये  वाढलेल्या तणावाने अनेक भारतीय पालकांच्या छातीत धडकी भरली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी परतण्याच्या तयारीत असताना त्यांचा प्रवास रोखला गेला आहे. यामध्ये नावापूर (जि. नंदूरबार) येथील  आशिका ध्रुवराज सोनार हिच्यासह पुण्यातील दोन, तर मुंबईतील एक अशा तीन मुली अडकून पडल्या आहेत.
तिच्या वास्तव्यापासून दीड किलोमीटरवर असलेल्या ‘किव’  विमानतळावर रशियाने हल्ला केला, तर १९ किलोमीटरवरील मायकोलेव्ह आंतरराष्ट्रीय विमानतळावरची हवाई वाहतूक पूर्णत: रोखण्यात आली आहे.

...तर बंकर्सचा आधार घ्यावा लागणार
आशिकाशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. तेव्हा ती म्हणाली, सायंकाळी सहानंतर होस्टेलबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सायरन वाजताच आम्ही बंकर्सचा आधार घ्यावा, अशी सूचना  प्रशासनाने केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंचा पुढाकार
मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधून युक्रेनमधील महाराष्ट्रीय नागरिक, विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यासाठी पाऊले उचलावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून  उद्योग, शिक्षण, व्यवसायानिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून, मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Russia Ukraine Crisis Bombs destroyed buildings roads and mountains of smoke in the sky know what indian students saying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.