Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:54 PM2022-02-23T17:54:52+5:302022-02-23T18:00:45+5:30
आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे.
युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने रशियन आक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी युक्रेनच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने, युक्रेन डोनेस्त्क आणि लुहान्स्क हे प्रदेश वगळता संपूर्ण युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करेल, असे म्हटले होते. तसेच, आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे.
तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पूर्व युक्रेनमधील (Ukraine) रशियन समर्थक फुटिरतावादी ‘डोनेत्स्क आणि लुहान्स्क पीपुल्स रिपब्लिक’’ यांना एक “स्वतंत्र” देश म्हणून मान्यता दिली आहे. पुतीन यांनी सोमवारी रात्री टेलीव्हिजनवर राष्ट्राला संबोधित केले होते. यावेळी बोलताना त्यांनी, किवच्या पश्चिमेसोबत वाढत असलेल्या सुरक्षा संबंधांवर टीका केली. तसेच, यूएसएसआरचा इतिहास आणि युक्रेनच्या समाजवादी सोव्हिएत प्रजासत्ताकाच्या निर्मितीसंदर्भात भाष्य करताना युक्रेनच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारावर शंका व्यक्त केली. ते देशाच्या पूर्वेकडील भागास "प्राचीन रशियन भूमी" म्हणत म्हणाले, "युक्रेनला स्वतःच्या राज्याची परंपरा कधीच नव्हती."
पुतीन यांनी दिली संरक्षणाची हमी -
पुतीन यांच्या आदेशाने पूर्व यूक्रेनमधील डोनबास भागातील डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्कला पीपल्स रिपब्लिक (DPR, LPR) या दोन प्रदेशांबाबत मॉस्कोच्या अधिकृत मान्यतेसंदर्भात अवगत केले. त्यांना फरमानांमध्ये स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली आणि रशियन सैन्यासह त्यांच्या सुरक्षेची हमी दिली. याच बरोबर, रशियाचे तथाकथित शांतता सेन्य या प्रदेशांमध्ये तैनात केली जाईल, असे फरमानात म्हणण्यात आले आहे. पुतीन यांच्या या निर्णयानंतर, रशिया-युक्रेन संघर्ष शिगेला पोहोचला आहे.