नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारताला सर्वाधिक चिंता आहे ती युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची. युक्रेनची हवाई हद्द बंद आहे. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात माेठ्या आणि अवघड अशा बचाव माेहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीयांना हंगेरी, पाेलंड, राेमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकमार्गे एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. एअर इंडियाची दाेन विमाने रात्री उशिरा रवाना होणार आहेत. नंतर आणखी विमाने पाठविण्यात येऊ शकतात. याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.
रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडून हल्ला केला आहे. त्यामुळे पश्चिमेकडील देशांमधून भारतीयांना परत आणता येऊ शकते. त्यादृष्टीने माेहीम आखण्यात आली आहे. राजधानी किव्ह येथील विमानतळावरही हल्ले झाले हाेते. त्यामुळे भारतीयांना परत आणायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला हाेता. त्यातून मार्ग काढण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनच्या चार शेजारी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसाेबत यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती दिली. तर, गरज भासल्यास वायुदलाची विमानेदेखील एअरलिफ्ट माेहिमेसाठी सज्ज असल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली.
...तर विद्यार्थी अडकले नसतेसर्व वर्ग तिथे ऑफलाईन पद्धतीने सुरू हाेते. युद्धाची चाहुल लागल्यानंतर भारतीय दुतावासाला विद्यापीठाशी बाेलून ऑनलाईन वर्ग करुन देण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केली हाेती. ऑनलाईन वर्गाची विनंती मान्य केली असती तर आम्ही अडकलाे नसताे, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
...असे करणार एअरलिफ्ट
- हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकपर्यंत रस्तेमार्गे युक्रेनमधून भारतीय निघाले आहेत.
- तेथून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येईल. हंगेरीची झाहाेनी, पाेलंडची क्रेकाविच, स्लाेव्हाकची विस्ने आणि राेमानियाच्या सुशिव्हा सीमेपर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचे विविध पथके पाठविण्यात आली आहेत.
- या सीमांजवळ असलेल्या युक्रेनमधील भारतीयांनी जवळच्या पथकांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय आहेत. त्यापैकी ४ हजार जण तेथून बाहेर पडले आहेत. उर्वरित १६ हजार जणांना परत आणणार आहे.
सीमा गाठणार कशी?
- पाेलंड, राेमानिया आणि हंगेरीमार्गे भारतीयांच्या परतीचा मार्ग खुला झाला असला तरीही तेथे पाेहाेचणे अतिशय जिकिरीचे आहे.
- किव्ह येथून या देशांच्या सीमेवर पाेहाेचण्यासाठी १२ ते १४ तास लागू शकतात. काही विद्यार्थी राेमानिया सीमेवर पाेहाेचले आहेत.
- काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना सीमेपर्यंत पाेहाेचविण्यासाठी बसेसची साेय केली. काही टॅक्सीने हंगेरीच्या सीमेकडे निघाले.विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सध्या हालचाली नाहीत. मात्र, या देशांच्या सीमेजवळ असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बाहेर काढण्यात येणार आहे.