Russia Ukraine Crisis : शेकडो विद्यार्थी मेट्रो स्टेशनमध्ये आश्रयाला; रोमानिया, पोलंडकडे जाण्यात भारतीयांना प्रचंड अडथळे
By योगेश पांडे | Published: February 26, 2022 06:44 AM2022-02-26T06:44:30+5:302022-02-26T06:44:51+5:30
राजधानीतदेखील शिरल्या रशियाच्या तोफा
योगेश पांडे
युक्रेनमधील स्थिती आणखी गंभीर झाली असून, तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांचा जीव टांगणीला लागला आहे. राजधानी कीव्हमध्ये देखील रशियाचे सैन्य शिरले असून, देश सोडून जाण्याच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे खार्कोव्ह किव्हकडे निघालेले शेकडो विद्यार्थी रस्त्यातच अडकले आहेत. त्यातील अनेकांनी चक्क न्यायव्हकी मेट्रो स्थानक व टनेलमध्ये आश्रय घेतला आहे. मूळचे नागपूरकर व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एअरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर हे ‘लोकमत’च्या संपर्कात असून, प्रत्यक्ष वास्तव सांगत आहेत.
रोमानिया व पोलंडच्या सीमा खुल्या झाल्यामुळे अनेकांनी खासगी वाहनांनी तिकडे जाण्याचे ठरविले. भारतीय दूतावासाने देखील चारशे विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था केली होती. मात्र, मार्गावर युक्रेनकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलेली नाही. शिवाय राजधानीतून बाहेर पडण्याच्या मार्गांवर गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. त्यामुळे भारतीयांनी आहेत तेथेच थांबावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
रात्रभर दहशत, डोळ्यांसमोर रशियाचे रणगाडे
कीव्हमध्ये रात्रभर दहशतीचे वातावरण होते व सातत्याने गोळीबार तसेच बॉम्बस्फोटांचे आवाज येत होते. सकाळच्या सुमारास तर कीव्हमध्ये रशियाचे रणगाडे देखील शिरले. खिडकीच्या बाहेर पाहिले असता रशियन सैन्य दिसून येत आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांवर गोळीबार वगैरे केलेला नाही. प्रत्येक जण शक्य त्या पद्धतीने एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे हल्ल्याची भीती अशा दुहेरी संकटात लोक सापडले आहेत.
भारतीय राष्ट्रध्वज लावण्याच्या सूचना
स्लोव्हाकिया, हंगेरीने देखील युक्रेनमधून नागरिकांना प्रवेश देण्याची संमती दिली आहे. ज्या भारतीयांना हंगेरीत जायचे आहे, त्यांनी नोंदणी करायची आहे. आम्ही अनेकांची नोंदणी केली आहे. शुक्रवारची रात्र सरली की, स्थिती आणखी स्पष्ट होईल. भारतीय नागरिकांना त्यांच्या वाहनांवर भारतीय झेंडा लावण्याची तातडीची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुनेश्वर यांनी दिली.
भारतीयांकडून माणुसकीचे दर्शन
भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. खार्कोव्ह येथे अडकलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांना तेथील भारतीयांनी राहण्याची जागा दिली. या विद्यार्थ्यांना व नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढणे अत्यावश्यक आहे, अशी भावना मुनेश्वर यांनी व्यक्त केली.
‘पाण्याच्या घोटासाठी झालोय महाग’
प्रसाद कानडे
पुणे : दिवस-रात्र आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. वाजणारे सायरन, उरात धडकी भरविणारे बॉम्बहल्ले आणि आजूबाजूला दिसणारा रक्तपात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. सततच्या बॉम्ब वर्षावात आपण सुरक्षित आहोत हिच येथील प्रत्येकाची भावना आहे. सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे, असे पुण्याची शिवानी लोणकर सांगत होती. तिच्यासारख्या हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत.
शिवानी किव्हमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. ती म्हणाली, युक्रेनची परिस्थिती शिवानी सांगतेय. सध्याची स्थिती आणीबाणीची आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच मदत करीत नाही. सायरन वाजताच शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पण शेल्टर मधील परिस्थिती भीषण आहे. पिण्यास देखील पाणी नाही.