वॉशिंगटन - रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine) आक्रमण केलेच, तर तो तेथे मोठ्या प्रमाणावर कत्तली करेल. अमेरिकेने दावा केला आहे की, रशियाने हिटलिस्टदेखील तयार केली आहे. टीकाकार, मॉस्कोविरोधक आणि युक्रेनमधील कमकुवत वर्ग रशियाच्या निशाण्यावर आहे. रशियन सैन्य या लोकांना ठार केरेल. पण, रशियाने अमेरिकेचा हा दावा फेटाळला आहे. रशियाने पूर्व युक्रेनच्या दोन प्रांतांना वेगळे देश म्हणून मान्यता दिल्यानंतर, आता या दोन्ही देशांमधील युद्ध जवळपास निश्चित मानले जात आहे.
US नं पत्र लिहून व्यक्त केली शक्यता -WION ने वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संगटनांमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी राजदूत बाथशेबा नेल क्रोकर (Bathsheba Nell Crocker) यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बाचेलेट (Michelle Bachelet) यांना एक पत्र लिहिले आहे. यात, युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याची रशियाची योजना असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नावांसह यादी तयार -राजदूत (Ambassador) बाथशेबा नेल क्रोकर यांनी पत्रात लिहिले आहे, "आमच्याकडे विश्वसनीय माहिती आहे. जिच्या आधारे स्पष्ट होते, की रशियन सैन्याने एक हिट लिस्ट तयार केली आहे. ही यादी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आमलात आणली जाणार आहे." या यादीत, ज्या लोकांना मृत्यूदंड द्यायचा आहे अथवा डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवायचे आहे, अशांची नावे आहेत. अमेरिकेचे म्हणणे आहे, की रशिया त्यांचा विरोध करणाऱ्यांना निशाणा बनवणार आहे. यात यूक्रेनमध्ये राहणारे रशिया आणि बेलारूसमधील असंतुष्ट, पत्रकार, भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते, अल्पसंख्यक आणि LGBTQI+ समुदायाचा समावेश आहे.