शिवराज बिचेवार
Russia Ukraine Crisis : रशियाने केलेल्या आक्रमणामुळे मृत्यूचे तांडव सुरू असतानाही युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ऑनलाइन रुग्णसेवेचे धडे गिरवित आहेत. विशेष म्हणजे तासिका बुडविल्यास त्यांना आर्थिक दंडही आकारण्यात येतो. त्यामुळेच देशातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा युक्रेनकडे अधिक ओढा असतो.
स्वप्नील सुनील पाटील हा युक्रेनच्या चर्निविस्ट येथील बुकोनियन मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी युद्ध सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी देशात आला. सध्या तो नांदेडातील आपल्या घरी राहून ऑनलाइन शिक्षण घेत आहे. दिवसभर त्याच्या तासिका सुरू असतात. भारतीय दूतावासाने ज्यांना देशात परत जायचे आहे त्यांनी जावे अशा नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतर स्वप्नीलसह अनेक विद्यार्थी कीव्ह येथून विमानात बसले. स्वप्नील हा नांदेडात पोहोचला आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली. स्वप्नील म्हणाला, युक्रेनमध्ये सहा वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राहणे आणि खाणे-पिणे यासह जवळपास ३० ते ३२ लाखांचा खर्च येतो. त्याचबरोबर शिक्षणही उच्च दर्जाचे आहे.
तेथे दर दिवशी होते परीक्षा विद्यापीठात दररोज घेण्यात आलेल्या तासिकांवर दुसऱ्या दिवशी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत ५ पैकी ३ गुण मिळविणे बंधनकारक आहे. ३ गुण मिळत नाहीत तोपर्यंत तो पेपर वारंवार द्यावा लागतो. वर्षभरात झालेल्या सर्व तासिकांना हजर राहणे गरजेचे आहे. तासिकेला दांडी मारल्यास विद्यार्थ्यांना एका तासिकेसाठी ५० रॅव्हियल म्हणजे भारतीय चलनात १०० रुपये दंड पडतो. तसेच त्या प्राध्यापकाला विनंती करून अभ्यासक्रम समजून घ्यावा लागतो.