मॉस्को: युक्रेनसोबतचे संबंध तणावपूर्ण झाले असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची घोषणा पुतीन करू शकतात. आज या प्रकरणात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. रशियानं पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा दिल्यास तणावात आणखी भर पडेल. रशिया स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याच्या तयारीत असलेल्या पूर्व युक्रेनमध्ये रशियन बंडखोरांचं प्राबल्य आहे.
पूर्व युक्रेनला मान्यता देण्याबद्दल विचार सुरू असल्याचं सुरक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुतीन यांनी सांगितलं होतं. रशिया तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत आहे. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं पुतीन पुढे म्हणाले. नाटो आणि अमेरिकेची खात्री आम्ही देऊ शकत नाही, असं म्हणत पुतीन यांनी अमेरिकेला डिवचलं.
युक्रेननं नाटोचा भाग होऊ नये असं रशियाला वाटतं. युक्रेन नाटोचा सदस्य झाल्यास नाटोचे सैनिक रशियन सीमेलगत तैनात होतील. सीमावर्ती भागात लष्करी तळ उभारले जातील, असं रशियाला वाटतं. त्यामुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याबद्दल अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी चिंता व्यक्त केली आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती या देशांना आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची तत्काळ बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी युक्रेननं केली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री यासाठी आग्रही आहेत. युक्रेननं सीमेवर गोळीबार करून नुकसान केल्याचा दावा रशियानं केला आहे. रशियाच्या भागात घुसखोरी करणाऱ्या ५ जणांना ठार करण्यात आल्याचं रशियन सैन्यानं सांगितलं. मात्र रशियाच्या हद्दीत जाऊन कोणतही नुकसान केलं नसल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं.