मॉस्को: रशिया आणि युक्रेनमध्ये जवळापास युद्धाला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज अचानक रशियाने आक्रमक होत, युक्रेनचे पाच सैनिक मारल्याचा दावा केला आहे. रशियाच्या सीमेवर या सैनिकांनी घुसण्याची आगळीक केली, प्रत्युत्तरादाखल रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात हे सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे. तसेच युक्रेनकडून रशियन सीमेवर गोळीबार होत असल्याचा आरोपही रशियाने केला आहे.
याचबरोबर रशियाने युक्रेनची दोन लष्करी वाहने उडवून दिल्याचा दावा केला आहे. ही वाहने सीमेवर घुसखोरी करत असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या साउदर्न मिलिट्री डिस्ट्रिक्टने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करण्यात आला आहे. रशियन सैनिक आणि एफएसबी बॉर्डर गार्डस यांनी पाच युक्रेनी सैनिकांना मारले आहे.
रशियाच्या या आरोपांनंतर युक्रेनने या घटनेचे खंडन केले आहे. युक्रेनने असे काहीही केलेले नाही. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट करून हे प्रत्यूत्तर दिले आहे. दिमित्रो कुलेबा यांनी म्हटले की, डोनेट्स्क आणि लुहान्स्कीवर हल्ला केलेला नाही. रशियावर गोळीबार केलेला नाही. तसेच कोणत्याही विद्रोहींना सीमापारही पाठविलेले नाही, असे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी युक्रेनने रशियन समर्थीत विद्रोहींच्या हल्ल्यात एक युक्रेन सैनिक मारला गेल्याचे म्हटले होते. तसेत गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या गावांमध्ये हल्ले केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.