कीव्ह: रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईला आता १०० दिवसांहून अधिक काळ होत आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर तीव्र हल्ले करत प्रचंड नासधूस केली आहे. मात्र, तरीही युक्रेन रशियासमोर गुडघे टेकायला तयार नाही. रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले आहेत. १०० दिवस उलटल्यानंतरही कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. अशात आता रशियाने युक्रेनमधील तब्बल ५ लाख टन गहू परस्पर आफ्रिकी देशांना विकल्याची माहिती समोर आली आहे. या गव्हाची किंमत ७७८ कोटींच्या घरात आहे.
रशिया आणि युक्रेन आफ्रिकेच्या देशांना ४० टक्के गव्हाचा पुरवठा करतात. यंदा गव्हाच्या दरात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आफ्रिकेतील १७ दशलक्ष लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत. याचा फायदा घेत रशियाने युक्रेनमधील गहू परस्पर विकल्याचे सांगितले जात आहे.
रशियावर गहू चोरीचा आरोप पुन्हा सुरू
अमेरिकेने इशारा देत तीन रशियन मालवाहू विमानांची नावे जारी केली आहेत. परंतु युक्रेन हल्ल्यात शक्तिशाली पाश्चात्य देश आणि रशिया यांच्यात अडकलेले आफ्रिकन देश आधीच योग्य प्रतिकार करू शकणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यापैकी बरेच देश रशियन शस्त्रांवर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियावर गहू चोरीचा आरोप पुन्हा सुरू केला आहे. आफ्रिकन युनियनचे प्रमुख सेनेगलचे मेके साल यांनी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेऊन खत आणि धान्याची मागणी केली होती.
दरम्यान, रशियाने युक्रेनला मदत करणाऱ्या पाश्चिमात्य देशांना इशारा दिल्यानंतर लगेचच कीव्हवरील हल्ले करण्यात आले. काही दिवसांनंतर, रशियन सैन्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधांसह कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. दुसरीकडे, युक्रेनच्या उच्च अधिकार्याने सांगितले आहे की, रशियन सैन्याने आतापर्यंत डोनेस्तक भागातील ४३ धार्मिक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.