Russia-Ukraine Crisis: रोखणारे कोणीच नाही; रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले, लुहान्स्क आणि डोनेत्स्कवर मिळवला ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:13 PM2022-02-22T16:13:58+5:302022-02-22T17:32:15+5:30
Russia-Ukraine Crisis: रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीला ब्रिटनने दुजोरा दिला आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या कारवाईला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 13 तासांपूर्वी (भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता) युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. पण, आता त्याच दोन राज्यांमध्ये रशियन सैन्य घुसल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याचे रणगाडे भागांमध्ये घुसले आहेत. फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील लुहान्स्क-डोनेत्स्क प्रदेशात शांतता राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे पुतीन म्हणाले.
रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीला ब्रिटनने दुजोरा दिला आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जाविद म्हणाले - युक्रेनमध्ये रशियन आक्रमकता सुरू झाली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या कारवाईला आम्ही घाबरत नसल्याचे म्हटले आहे. रशियाने कितीही घोषणा केली आणि धमक्या दिल्या, तरीदेखील युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय सीमा पूर्वीप्रमाणेच राहतील, असे झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान, युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित करण्याच्या पुतिन यांच्या निर्णयानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
रशियाच्या पावलावर जग भडकले
लुहान्स्क-डोनेत्स्क स्वतंत्र घोषित करण्याच्या पुतिन यांच्या निर्णयाचा जगभरातून निषेध होत आहे. नाटो प्रमुखांनी हे आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांनी त्याच्याविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशारा दिला आहे. UNSC मधील युक्रेनचे राजनयिक सर्गेई किसलित्स्या म्हणाले - आम्ही या समस्येवर राजकीय आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी वचनबद्ध आहोत, परंतु आम्ही चिथावणी देण्यापुढे झुकणार नाही.
अमेरिकेने लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रदेशावर बंदी घातली
दरम्यान, अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रदेशात गुंतवणूक करण्यास मनाई करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेशिवाय ईयू आणि ब्रिटननेही रशियावर निर्बंध लादण्याबाबत बोलले आहे. याशिवाय बिडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी युनायटेड स्टेट्सने आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.
एअर इंडियाचे विशेष विमान युक्रेनला रवाना झाले
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची कसरत तीव्र केली आहे. एअर इंडियाचे विशेष विमान मंगळवारी सकाळी युक्रेनला रवाना झाले. हे विमान आज रात्री दिल्लीला परतेल. मिळालेल्या माहितीनुसार, 20000 हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या विविध भागात राहतात.