मनीषा म्हात्रे (फोटो : सुशील कदम)Russia Ukraine Crisis : चहूबाजूंनी सैन्याने घेरलेले...युद्धजन्य परिस्थिती... अशातच ‘मम्मी, तुम टेन्शन मत लो...’ म्हणत युक्रेनच्या विनित्सिया भागात बंकरमध्ये अडकून असलेली मुंबईची यशस्वी सेठिया आईलाच दिलासा देत आहे. मात्र, आईच्या काळजाचा ठोका चुकला आणि मुलगी सुखरूप घरी परतावी यासाठी त्यांची दिवसरात्र धडधड सुरु झाली आहे. यशस्वी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
वडाळा परिसरात राहणाऱ्या अर्पिता सेठिया यांची मुलगी यशस्वी ही युक्रेन येथील विनित्सिया विद्यापीठात २०१९ पासून शिक्षणासाठी आहे. अर्पिता या शिक्षिका असून त्यांचे पती व्यावसायिक आहेत. त्यांचा एक मुलगा अमेरिकेला असतो.
युक्रेन - रशिया यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून सेठिया त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आपल्या मुलीला भारतात आणण्यासाठी त्यांची दिवसरात्र धडपड सुरू आहे. मुलीशी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क सुरू आहे. सध्या सगळेच विद्यार्थी युद्धाच्या दहशतीखाली आहेत. कधीही, कुठेही बॉम्ब पडू शकतो, अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुवातीला भारताचे पहिले विमान मुलांना घेण्यासाठी गेले तेव्हा, विद्यापीठाकडून विद्यार्थ्याना आता गेल्यास पुन्हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करावा लागणार असल्याचे सांगितल्यामुळे विद्यार्थी भीतीने तेथेच थांबले. विद्यापीठ आणि प्रशासनामधील गैरसमज झाल्यामुळे विद्यार्थी तेथेच अडकले. गुरुवारी मिलिटरी कॅम्पवर हल्ला होताच, या विद्यार्थ्याना मिळेल त्या वस्तू, पैसे, खाण्याचे सामान घेऊन रात्री बंकरमध्ये हलवण्यात आले. जवळपास ८०० विद्यार्थी तेथे असल्याचे अर्पिता सांगतात.
ट्रेन विद्यार्थ्याना घेऊन पुन्हा माघारी
- शुक्रवारी त्यांची मुलगी यशस्वीने बंकरमधून आईला व्हिडिओ कॉल केला.
- मुलीला पाहून अर्पिता यांना अश्रू अनावर झाले. यातच, स्वतः भीतीच्या सावटाखाली असतानाही यशस्वी आईलाच ‘टेन्शन मत लो’ म्हणत काळजी घेण्यास सांगत आहे.
- आम्ही सुरक्षित आहोत. येथील काही विद्यार्थ्याना सायंकाळी ट्रेनने रुमानियाला घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र अर्ध्या वाटेवरून पुन्हा माघारी आणले.