Russia-Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनवर 'डबल अटॅक', वेबसाईटसह बँकांना केलं लक्ष्य; 2 देशांत असं होतंय 'सायबर युद्ध'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:31 PM2022-02-24T15:31:23+5:302022-02-24T15:39:59+5:30
Russia-Ukraine Cyber Attack : रशियाने युक्रेनच्या सरकारी वेबसाइट्स, बँक आणि इतर संस्थाना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. याचबरोबर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. हे युद्ध केवळ सैनिकांपुरते मर्यादित नाही. सायबर अटॅकद्वारे देखील हे युद्ध लढले जाणार आहे.
रशिया युक्रेनवर सातत्याने सायबर अटॅक करत आहे. एका रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या सरकारी वेबसाइट्स, बँक आणि इतर संस्थाना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेननुसार, त्यांना गेल्या आठवड्यात चेतावणी मिळाली होती की हॅकर्स सरकारी एजन्सी, बँक आणि डिफेंस सेक्टरवर अटॅक करणार आहे. गेल्या काही दिवसात युक्रेनवर सातत्याने सायबर अटॅक्स होत आहे. यासाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. नवीन रिपोर्टनुसार, युक्रेनवर पुन्हा एकदा सायबर अटॅक करण्यात आला आहे. यामध्ये अनेक बँकांच्या वेबसाइटसह संसदेच्या वेबसाईटला देखील निशाणा बनवण्यात आले आहे. मात्र, कोणत्या बँकांवर याचा परिणाम झाला आहे, याची माहिती युक्रेनने दिलेली नाही.
इंटरनेट ब्लोकेजवर लक्ष्य ठेवणाऱ्या NetBlocks नुसार, युक्रेनच्या सरकारी वेबसाईटच्या कनेक्शनमध्ये ड्रॉप ऑफ पाहायला मिळत आहे. म्हणजेच, सायबर वॉरमध्ये देखील रशिया अग्रेसर आहे. सातत्याने युक्रेनच्या सरकारी वेबसाईट आणि बँकांच्या वेबसाईट्सला निशाणा बनवत आहे. एका रिपोर्टनुसार, सायबर ऑपरेशनच्या माध्यमातून गोपनीय माहिती गोळा केली जात आहे व याचा वापर लष्कराच्या कारवाईसाठी केला जाईल. तसेच, क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चरला देखील सायबर अटॅकद्वारे लक्ष्य केले जात आहे. सायबर स्पेसमध्ये आपला दबदबा दर्शविण्यासाठी सिव्हिलियन इंफ्रास्ट्रक्चरला टार्गेट केले जात आहे. म्हणजेच, युद्ध केवळ मैदानावरच नाही तर सायबर हल्ल्याद्वारे देखील लढले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रशियन हल्ल्यानंतर युक्रेनच्या लोकांमध्ये राजधानी कीव सोडण्यासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे, कीवचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम झाले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने आपण रोख रकमेची मर्यादा ठरवत असल्याचे सांगितले आहे. यानंतर लोक त्यांच्या खात्यातून एका दिवसात फक्त 100,000 Ukrainian hryvnia काढू शकतील. युक्रेनच्या लष्कराने युद्धादरम्यान मोठा दावा केला आहे. युक्रेनमधील Shchastya शहर सध्या युक्रेनच्याच ताब्यात आहे. त्यांनी तिथे 50 रशियन सैनिकांना ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, सहा विमानेही खाली पाडण्यात आली आहे. यापूर्वी पाच विमाने आणि हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता.