Russia Ukraine War: अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:58 PM2022-03-01T16:58:34+5:302022-03-01T16:59:12+5:30
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे.
अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. युक्रेनविरोधात रशियानं पुकारलेल्या युद्धाच्या पाचव्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेसह अनेक देशांनी निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रशियन राजदूतांनी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सामील होऊन अमेरिकेत वास्तव्याचा अधिकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवणारं काम केलं आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
हकालपट्टीची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून सुरू होती आणि १९३ सदस्यीय जागतिक संस्थेचे यजमान म्हणून संयुक्त राष्ट्रांशी अमेरिकेनं केलेल्या करारानुसारच निर्णय घेण्यात आला असल्याचंही अमेरिकेनं म्हटलं आहे. 'कोणत्याही व्यक्तीची हकालपट्टी करताना रशियन अधिकारी हेरगिरीच्या प्रकरणात सामील होते हे एकच कारण नेहमी दिलं जातं', असं रशियन राजदूत वसिली नेबेन्झिया म्हणाले.