अमेरिकेसह काही देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांची पर्वा न करता रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेन व रशियाच्या लष्करात झालेल्या संघर्षात 100 हून अधिक जण ठार झाले आहेत. गुरुवारी भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा आठ वाजता रशियाच्या विमानांनी युक्रेनमधील कीव्ह, खार्किव्ह यासह काही शहरांवर भीषण बॉम्ब व क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. युक्रेनी लष्कराचे 74 तळ उद्ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या 11 तळांचा समावेश असल्याचा दावा रशियाने केला आहे. तर रशियाची 6 लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर लेकीच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे. नागरिकांना आसरा घेण्यासाठी काही सुरक्षित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते.
New News EU या ट्विटर अकाऊंटवरून डोळे पाणावणारा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. "आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर आणि रशियन सैन्याशी लढण्यासाठी मागे थांबल्यानंतर लेकीचा निरोप घेताना भावूक झालेला पिता" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाने युक्रेनवरील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी व आपले सैन्य माघारी न्यावे, असा इशारा नाटोने दिला आहे. अनेक लढाऊ विमाने तसेच भूमध्य सागराच्या हद्दीत 120 हून अधिक युद्धनौकांचा ताफा नाटोने सज्ज ठेवला आहे.
रशियाक़डून हल्ले
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा करताच पुढील पाच मिनिटांत युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले सुरू झाले. युक्रेनवर रशिया, बेलारूस आणि क्रिमिया या तीन बाजूंनी हल्ला करण्यात आला आहे. लुहान्स्क, खार्कीव, चेर्नीव, सुमी आणि जेटोमीर या प्रांतांवर हल्ले करण्यात आले आहेत. रशियन पायदळानेही युक्रेनमध्ये घुसून सीमावर्ती भागातील काही गावांवर कब्जा मिळवला आहे.