७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, बचावासाठी केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:42 PM2024-03-06T12:42:40+5:302024-03-06T12:43:57+5:30
russia ukraine war news: रशियात गेलेल्या पंजाब आणि हरयाणातील सात तरूणांसोबत धक्कादायक प्रकार घडला.
Russia Ukraine News: नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेलेल्या पंजाब आणि हरयाणातील सात तरूणांसोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी व्हिडीओ शेअर करत भारत सरकारकडे मदतीचं आवाहन केलं आहे. रशियामध्ये फिरायला गेले असता तिथं त्यांना जबरदस्तीनं लष्करी सेवेत काम करावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच रशिया आणि युक्रेन युद्धासाठी आमचा बळजबरीनं वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये हे तरुण एका बंद खोलीत असल्याचे दिसतात.
गगनदीप सिंग (२४), लवप्रीत सिंग (२४), नारायण सिंग (२२), गुरप्रीत सिंग (२१), गुरप्रीत सिंग (२३), हर्ष कुमार (२०) आणि अभिषेक कुमार (२१) अशी या तरुणांची नावं आहेत. ते पंजाब आणि हरयाणा येथील रहिवासी आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, ते एका बंद खोलीत लष्करी जवानांचं जॅकेट आणि डोक्यावर टोपी परिधान केलेल्या अवस्थेत आहेत.
हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय हर्षने त्यांची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं भारत सरकारकडं मदतीसाठी आवाहन केलं आहे. हर्षच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्ष साजरं करण्यासाठी तो मित्रांसह २७ डिसेंबरला ९० दिवसांचा व्हिसा घेऊन रशियाला गेला होता. त्यांना तिथं एका एजंटने फसवलं, ज्यानं त्यांना बेलारूसला नेण्याचं आश्वासन दिलं, परंतु व्हिसाच्या आवश्यकतेबद्दल त्यांना काहीच माहिती दिली नाही. ते बेलारूसला पोहोचल्यावर एजंटनं आणखी काही पैसे मागितले. त्याला त्यांनी पैसे देखील दिले. मात्र तो पैसे घेऊन त्यांना तिथेच सोडून गेला. त्यानंतर तेथील पोलिसांनी सात जणांना पकडून रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.
बचावासाठी केली विनंती
व्हिडीओच्या माध्यमातून हर्षने आरोप केला आहे की, त्याला काही कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडले गेले. आता त्यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यास भाग पाडले जात आहे. हर्षला परदेशात जाऊन नोकरी करायची होती, असा खुलासा हर्षच्या कुटुंबीयांनी केला. खरं तर त्याला एजंटकडून सांगण्यात आले की, रशियातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणे सोपे होईल. तर हर्षचा सहकारी असलेल्या गुरप्रीत सिंगचा भाऊ अमृत सिंगने सांगितले की, त्यांनी स्वाक्षरी केलेली कागदपत्रे रशियन भाषेत असल्याने त्यांना काही समजले नाही. मग त्यांना बेलारूसमध्ये लष्करी सेवेत बळजबरीने तैनात करण्यात आले. त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास किंवा रशियन सैन्यात सामील होण्याचा पर्याय देण्यात आला होता.