कीव्ह: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता रशियाचा वरचष्मा दिसून येत आहे. रशियाने युक्रेनचा 20 टक्क्यांहून अधिक भागावर कब्जा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने युक्रेनचा 1 लाख 6 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेनवर सुरू असलेला हल्ला पाहता आज बेलारूस-पोलंड सीमेवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार होती, मात्र युक्रेनने या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला.
'आमचा अणूयुद्धाचा विचार नाही'रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी म्हणाले की, इतर देश युक्रेनला युद्धात मदत करत आहेत. पण आम्ही शेवटपर्यंत ही लढाई सुरुच ठेवणार. ते पुढे म्हणाले की, रशियाने कधीच अणुयुद्धाचा विचार केला नाही. पण, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीच रशियावर नाझीवादाचा आणि अणूयुद्ध सुरू करत असल्याचा आरोप केला आहे.
रशियाचे चहुबाजूंनी हल्लेरशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली असून, रशियन सैन्य चहुबाजूंनी युक्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनचा आरोप आहे की, रशियन सैन्य लष्करी तळांसह युक्रेनच्या नागरी भागांवर बॉम्बफेक करत आहे. यावर लावरोव्ह म्हणाले की, रशियन सैन्याला लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे कठोर आदेश आहेत.
युद्धात किती जणांचा मृत्यू?युक्रेनमध्ये आठ दिवस चाललेल्या युद्धात किती लोक मारले गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशिया किंवा युक्रेनने मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या दिली नाही. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, 2,000 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत, पण या दाव्याची पुष्टी होऊ शकली नाही. यूएन मानवाधिकार कार्यालयाने सांगितले की, त्यांनी 136 नागरी मृत्यूची नोंद केली आहे, परंतु वास्तविक मृतांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे.