नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी युक्रेनची परिस्थिती सांगितली. तसेच, त्यांनी युक्रेनमध्ये भारतीयांसोबत होत असलेल्या गैरवर्तणूकीवर भाष्य केले. ते म्हणाले, 'आमच्यावर दररोज बॉम्बफेक होत आहे. केवळ रशियाच नाही, तर बेलारुसकडूनही हल्ले होत आहेत. आतापर्यंत 16 मुलांचा मृत्यू झालाय, रशिया चिल्ड्रन पॉलीक्लिनिक आणि अगदी लहान मुलांच्या शाळांनाही लक्ष्य करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, युक्रेनने युद्धाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. या संकटाच्या काळात हजारो लोक दुतावासाबाहेर येऊन प्रोत्साहन देत आहेत, त्यासाठी आम्ही भारतीय नागरिकांचे आभारी आहोत. युक्रेनमध्ये आमचे लाखो लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमेवर मोठी रांग आहे. यामध्ये परदेशी तसेच निर्वासित म्हणून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत ते म्हणाले की, भारतीय विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय विद्यार्थ्यांशी गैरवर्तणूक केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ही चुकीची माहिती पसरवली जात आहे. जे लोक शिस्तीचा भंग करतात, त्यांनाच आमचे रक्षक रोखण्याचा प्रयत्न करतात. हा नियम प्रत्येकासाठी लागू आहे. आम्ही वयक्ति कुणालाही टार्गेट करत नाहीत.