Russia Ukraine War: युक्रेनला ऑस्ट्रेलियाची मोठी मदत, 5 कोटी डॉलर्सची सैन्य उपकरणे पुरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 02:34 PM2022-03-01T14:34:55+5:302022-03-01T14:35:03+5:30
Russia Ukraine War: मागील सहा दिवसांपासून रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे.
कीव: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले करुन मोठा विध्वंस करत आहे. ताज्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनमधील खार्किव आणि कीवमधील सुमी प्रांतातील ओख्टीरका येथील लष्करी तळावर हल्ला केला आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाने युक्रेनला मोठी लष्करी मदत पुरवण्याची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलिया क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे पुरवणार
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा देश रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला मानवतावादी मदत म्हणून $50 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे पुरवणार आहे. मॉरिसन यांनी सांगितल्यानुसार, यापैकी बहुतेक शस्त्रे प्राणघातक श्रेणीत मोडतात.
रशियात चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी
रशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा जगभरातील देशांनी निषेध केला असून, विविध माध्यमातून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. आता हॉलिवूडच्या तीन मोठ्या स्टुडिओने आगामी 'द बॅटमॅन'सह इतर चित्रपटांना रशियात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वॉर्नर ब्रदर्स, द वॉल्ट डिस्ने कंपनी आणि सोनी पिक्चर्स या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला.
युक्रेनचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत
अमेरिकन कंपनी मेक्सर टेक्नॉलॉजीने जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, रशियन सैन्याची मोठी तुकडी कीवपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरापर्यंत आली आहे. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी यूएस सिनेटर्सना सांगितले की, युक्रेनला सध्या अधिक लष्करी शक्तींची गरज आहे. संकटकाळात युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकन संसद पूरक निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे.