कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली, पण अद्यात तोडगा निघालेला नाही. दरम्यान, युक्रेनची चिंता आता आणखी वाढली आहे. रशिया आणि युक्रेनचा शेजारी असलेला आणि रशियाचा मित्र असलेल्या बेलारुसने सोमवारी रशियाला त्यांची अण्वस्त्रे आणि सैन्य बेलारुसमध्ये कायमस्वरुपी तैनात करण्यास परवानगी दिली आहे.
बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी ही परवानगी दिली आहे. रशिया हा बेलारुसचा प्रमुख मित्र आहे आणि गेल्या आठवड्यात लुकाशेन्को यांनी रशियन सैन्याला बेलारुसचा भूभाग वापरुन उत्तरेकडून युक्रेनवर आक्रमण करण्याची परवानगी दिली होती. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर बेलारुसने अनेक अणुबॉम्ब साठवले होते. पण नंतर ते रशियाला परत करण्यात आले. आता पुन्हा एकदा रशियाची अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात होणार आहेत.
बेलारुस आपले सैन्य युक्रेनला पाठवू शकतोरशिया आणि बेलारुसचे जवळचे संबंध आहेत. अशा स्थितीत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेलारुस सोमवारपर्यंत युक्रेनमध्ये सैन्य पाठवू शकतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा बेलारुसने पाठिंबा दिला आहे. रशियाने गेल्या आठवड्यात 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला होता. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका अमेरिकी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बेलारुसचा रशियाच्या बाजूने युद्धात सामील होण्याचा निर्णय येत्या काळात रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेवर अवलंबून असेल.
रशियाने आण्विक शक्तींना सतर्क केलेदुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांना हाय अलर्टवर ठेवण्याच्या आदेशामुळे युक्रेनबाबत तणाव वाढला आहे. पुतिन यांनी रविवारी रशियाची अण्वस्त्रे वापरण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले, ज्यामुळे शीतयुद्धानंतरची दीर्घकाळापासूनची भीती समोर आली. ते म्हणाले की नाटोने रशियाच्या दिशेने आक्रमक विधाने केली आहेत आणि रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचा हवाला दिला आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सीएनएनला सांगितले की, पुतिन यांनी रशियाच्या अण्वस्त्रांना सतर्क राहण्यास सांगणे धोकादायक आहे.