मॉस्को: युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देश रशियावर विविध निर्बंध लादत आहेत. यातच आता तेल पुरवठ्यावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिका आणि युरोपला रशियाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. रशियाच्या मंत्र्याने म्हटले की, युरोपिय युनियन आमच्यावर अशा प्रकारचे निर्बंध लादण्याचा विचार करत असेल, तर त्यांनी कच्चे तेल $300 प्रति बॅरलेने खरेदी करण्यास तयार रहावे.
अमेरिकेने नुकताच युरोपियन युनियनसह आम्ही रशियाचा क्रूड पुरवठा थांबवू, असा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $139 च्या पुढे गेली होती. दरम्यान, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्बंध लादल्यास पाश्चात्य देशांना प्रति बॅरल 300 डॉलर खरेदी करावे लागेल, असा स्पष्ट इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या बंदीचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होईल. जागतिक क्रूड पुरवठ्यात रशियाचा वाटा 8 टक्के आहे, तर युरोपच्या पुरवठ्यात 30 टक्के वाटा आहे.
...तर जर्मनीचा गॅस पुरवठा बंद होईलरशियाच्या ऊर्जा पुरवठ्यावर बंदी घालण्याचा विचारही करू नका, अन्यथा आम्ही जर्मनीला होणारा गॅस पाइपलाइनचा पुरवठा बंद करू, असा इशारा नोव्हाकने युरोपीय देशांना दिला. जर युरोपला आमच्याकडून तेल विकत घेणे थांबवायचे असेल, तर नंतर ते नुकसान भरुन काढण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. या काळात महाग तेल विकत घेण्याची तयारीही युरोपीय देशांनी ठेवावी, असेही नोव्हाक म्हणाले.
युरोपला शहाणपणाने निर्णय घ्यावा लागेलयुरोपीय देशांनी स्वतःच्या हिताचा विचार करायला हवा. आम्ही कुठल्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. आमच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर आम्ही इतर बाजारपेठेत पुरवठा सुरू करू. युरोप आमच्याकडून 40 टक्के गॅस खरेदी करतो. पुरवठा बंद झाल्यास भरपाई कशी करणार? याक्षणी आम्ही असे कोणतेही निर्बंध लादण्याचा विचार करत नाही, परंतु जर युरोप पुढे गेला तर आम्हालाही सक्ती करावी लागेल, असेही नोव्हाक म्हणाले.