कीव: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. यामध्ये युक्रेनियन नागरिकांसह इतर देशांतील लोकांचाही समावेश आहे. हे सर्व लोक आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी आश्रयस्थानाच्या शोधात आहेत. दरम्यान, राजधानी कीवमध्ये असलेल्या एका भारतीय रेस्टॉरंटने या आश्रीतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाने आश्रीतांसाठी आपले रेस्टॉरट खुले केले आहे. या ठिकाणी मोफत जेवणासोबत राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन रिपोर्टच्या वृत्तानुसार, कीवमध्ये असलेल्या 'साथिया' रेस्टॉरंटचे मालक मनीष दवे यांनी त्यांच्या रेस्टॉरंटचे तात्पुरत्या बंकरमध्ये रुपांतर केले आहे. या ठिकाणी त्यांनी 130 हून अधिक लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मनीष दवे म्हणाले की, या कठीण काळात शक्य तितक्या लोकांना जेवण आणि राहण्याची सोय ते करणार आहेत.
रशियन सैन्याने कीव आणि खारकीववर अनेक हल्ले केल्यामुळे येथील परिस्थिती बिकट झाली आहे. अशा कठीण काळात हे भारतीय रेस्टॉरंट केवळ भारतीयांनाच नाही तर युक्रेनसह इतर देशांतील नागरिकांनाही राहण्याची आणि जेवणाची सोय करत आहे. डझनभर विद्यार्थी, गरोदर महिला आणि बेघर लोक येथे राहत आहेत.
रेस्टॉरंटचे मालक मनीष दवे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, अनेक युक्रेनियन नागरिक देखील येथे आले आहेत. रेस्टॉरंट तळघरात असल्यामुळे नागरिक येथे सुरक्षित आहेत. रशियन हल्ल्याच्या वेळी या रेस्टॉरंटमध्ये राहण्यासोबतच लोकांना जेवणही दिले जात आहे. मात्र, मनीष दवे यांनी अन्नसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हालचालींवर निर्बंध असल्याने रेशनचा पुरवठा होत नाहीये. साथिया रेस्टॉरंटचे मालक मनीष दवे हे गुजरातच्या वडोदरा येथील आहेत आणि त्यांनी 2021 मध्ये कीवमध्ये इंडियन रेस्टॉरंट उघडले होते.