Ukraine Russia War: '...तोपर्यंत आम्ही हल्ले थांबवणार नाहीत'; रशियन संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:27 PM2022-03-01T17:27:05+5:302022-03-01T17:29:49+5:30
Ukraine Russia Conflict: दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या.
मॉस्को: मागील सहा दिवसांपासून युक्रेनवर रशियाचे लष्करी हल्ले सुरुच आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. रशियाने गेल्या सहा दिवसांत युक्रेनच्या विविध शहरात अनेक हल्ले करुन मोठा भाग ताब्यात घेतला. यादरम्यान, अनेक ठिकाणी मोठा विनाश झाला, पण पुतिन अजून थांबायला तयार नाहीत. यातच आता रशियाच्या संरक्षण मंत्र्यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.
'...तोपर्यंत हल्ले सुरू राहणार'
रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सेर्गेई शोएगु( Russian Minister of Defence is Army General Sergey Shoygu ) यांनी रशियाचे हल्ले थांबणार नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही युक्रेनच्या सामान्य नागरिकांवर हल्ले करत नाही आहोत. आम्ही फक्त युक्रेनचे लष्करी ठिकाणे उद्धवस्त करत आहोत. जोपर्यंत युक्रेन हार मानत नाही, तोपर्यंत आम्ही हल्ले सुरुच ठेवणार, असेही ते म्हणाले.
रशियाच्या हल्ल्यात भारतीय तरुणाचा मृत्यू
दरम्यान, युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "आज सकाळी खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आम्ही पीडित कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो."