Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिटरी अकादमीवर मिसाइल हल्ला, रशियन पॅराट्रूपर्सचे हल्ले सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:12 PM2022-03-02T15:12:27+5:302022-03-02T15:16:36+5:30
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. राजधानी कीवनंतर आता रशियाकडून खारकीववर हल्ले सुरू झाले आहेत.
कीव: रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशियन सैन्य अजून राजधानी कीवमध्ये घुसण्यात यशस्वी झाले नाही. यातच आता एक महत्वाची अपडेट येत आहे. रशियन सैन्य युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या खारकीववर कब्जा करण्याचा प्लॅन आखत आहे. कीवपेक्षा जास्त हल्ले सध्या खारकीववर होत आहे.
सरकारी इमारत जमीनदोस्त
रशियन सैन्याकडून खारकीवमध्ये आधीच बॉम्बफेक सुरू होती. पण, आता रशियाने त्यांचे पॅराट्रूपर्स या शहरात सोडणे सुरू केले आहे. यामुळे आता रशिया-युक्रेन युद्धाने भीषण रुप धारण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने खारकीवमधील युक्रेनच्या मिलिटरी अकादमी आणि पोलीस विभागाच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. कीवच्या न्यूज वेबसाईट ह्रोमाडस्केने दिलेल्या माहितीनुसार, खारकीवमधील मिलिटरी अकादमीवर रशियाने रॉकेट डागले. यानंतर लागलेल्या आगीताल विझविण्यासाठी 9 तास लागले.
Anton #Gerashchenko, an advisor to the head of #Ukraine's Ministry of Internal Affairs, published footage in which, according to his information, the building of the regional police department in #Kharkiv is being attacked. pic.twitter.com/pH10cb6rpH
— NEXTA (@nexta_tv) March 2, 2022
खारकीवच्या रस्त्यांवर रक्तरंजीत संघर्ष
खारकीवव येथील प्रादेशिक पोलिस विभागाच्या कार्यालयावर रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी केला आहे. जारी झालेल्या व्हिडिओमध्ये इमारत पूर्णपणे कोसळल्याचे दिसत असून त्यात आगही लागली आहे. याशिवाय रशियाचे पॅराट्रूपर्सही खार्किवमध्ये उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे खार्कीवच्या रस्त्यांवर आता एकामागोमाग एक मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी, खारकीव येथील स्थानिक रुग्णालयालाही रशियन सैनिकांनी लक्ष्य केले होते.
खारकीव-सुमीत भारतीय अडकले
दरम्यान, खारकीव आणि सुमीमध्ये अनेक भारतीय अजून अडकले असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकच्या नवीनचाही मंगळवारी खारकीवमध्ये मृत्यू झाला होता. बुधवारी रशियन हवाई दलाने खारकीवमध्ये जबरदस्त बॉम्बफेक केली. खारकीवसोबतच सुमीवरही हल्ला झाला आहे. दोन्ही शहरात रात्रभर सायरन वाजत होते. दोन्ही ठिकाणी भारतीय विद्यार्थी उपस्थित आहेत. महिला, लहान मुले आणि वृद्धांचे शहरातून पलायन सुरू आहे, पण 25 ते 50 वयोगटातील पुरुषांना शहराबाहेर जाण्याची परवानगी नाही.