कीव: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. मागील पाच दिवसांपासून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर विविध प्रकारे हल्ले केले जात आहेत. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे, तसेच रशियन सैन्याकडून शहरांवर हल्ले आणि बॉम्बफेक होत असल्याने युक्रेन सध्या तणावपूर्ण परिस्थितीशी झुंजत आहे. यातच आता इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक युक्रेनियन महिला उद्धवस्त झालेल्या घरातील कचरा साफ करताना देशाचे राष्ट्रगीत गाताना दिसत आहे.
हजारो नागरिकांना घरे सोडावी लागली
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर हजारो युक्रेनियन नागरिकांना आपापली घरे सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. मात्र, अजूनही काही लोक या संघर्षात अडकले असून ते बंकर, मेट्रो स्टेशन आणि इतर अनेक सुरक्षित ठिकाणी लपले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, ओक्साना गुलेन्को नावाची महिला उद्धवस्त झालेल्या घरातून काचेचे तुकडे साफ करताना दिसत आहे. तसेच, यादरम्यान ती युक्रेनचे राष्ट्रगीत गात आहे.
कीवमध्ये मोठे नुकसानरशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले करुन मोठा विध्वंस केला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात देशाची राजधानी कीवमध्ये मोठे नुकसान झाले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ओक्साना 'लाँग लिव्ह युक्रेन' म्हणत अश्रू ढाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.