Russia Ukraine War: रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:37 PM2022-02-28T14:37:32+5:302022-02-28T14:37:52+5:30
Russia Ukraine War: स्वीडनने युक्रेनला 5000 अँटी टँक रॉकेट लॉन्चर, 5000 सेफ्टी वेस्ट, 5000 हेल्मेट आणि 1,35,000 फील्ड रेशन देण्याची घोषणा केली आहे.
कीव: रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनच्या अनेक भागांवर रशियाचे हल्ले सुरुच आहेत. दुसरीकडे युक्रेनही मागे हटायला तयार नाही. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वीडनने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. स्वीडनने युक्रेनला 5000 अँटी-टँक रॉकेट लॉन्चर देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधानांचा निर्णय
स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. पीएम अँडरसन यांनी युक्रेनला 5000 अँटी टँक रॉकेट लॉन्चर, 5000 सेफ्टी वेस्ट, 5000 हेल्मेट आणि 1,35,000 फील्ड रेशन देण्याची घोषणा केली आहे. स्वीडनला मदतीसाठी एकूण 14 अब्ज SEK खर्च करावे लागणार आहेत.
Sweden will send military aid to Ukraine 🇺🇦. It includes 5,000 anti-tank weapons, 5,000 helmets, 5,000 body shields and 135,000 field rations. It also includes 500 million SEK to the Ukrainian Armed Forces🇺🇦. The total support is almost 1,4 billion SEK.
— Ann Linde (@AnnLinde) February 27, 2022
'हा एक विलक्षण निर्णय'
रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत पीएम अँडरसन म्हणाल्या, 'देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आपल्याला असाधारण निर्णय घेण्याची गरज असते. हा आमच्यासाठी एक असाधारण निर्णय आहे. कारण, यापूर्वी 1939 मध्ये फिनलंडवर सोव्हिएत संघाने हल्ला केला होता, तेव्हाही स्वीडनने अशा प्रकारचे समर्थन केले होते. आता आम्ही युक्रेन आणि युक्रेनियन लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. युद्धाची जबाबदारी संपूर्णपणे रशियन नेतृत्वावर आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदा युक्रेनला रशियन हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचा कायदेशीर अधिकार देतो.'
स्वीडनने रशियाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले
रशियाने युक्रेनला कुणीही मदत करू नका, असा इशारा इतर देशांना दिला होता. पण, स्वीडनने रशियाचा इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत ही मदत देवू केली. याशिवाय, रशियाने फिनलंड आणि स्वीडनला नाटोमध्ये सामील न होण्याची धमकी दिली होती. नाटोमध्ये सामील झाल्यास गंभीर लष्करी आणि राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा रशियाने दिला होता. पण, स्वीडनने त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.