कीव : युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर, संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम युक्रेनमधील रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी कीवला लढाऊ विमानांची ताजी रसद मिळण्याची शक्यता वाढली आहे. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह मंगळवारी पॅरिसमध्ये येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात युक्रेनला लढाऊ विमानांचा संभाव्य पुरवठा अधिकृत चर्चेसाठी अजेंड्यावर असू शकतो. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी वारंवार पाश्चात्य देशांना लढाऊ विमाने पुरवण्याचे आवाहन केले आहे. हवाई क्षेत्रात रशियाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि रशिया शस्त्रसाठा वाढवतील असे मानले जात आहे.
लढाऊ विमाने मिळणारफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की त्यांचा देश युक्रेनला लढाऊ विमाने पाठवण्याची शक्यता नाकारत नाही; परंतु अशा महत्त्वपूर्ण हालचाली करण्यापूर्वी अनेक अटींची यादी केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मात्र अमेरिका युक्रेनला एफ-१६ लढाऊ विमाने देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.