नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) मागील तेरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या बैठकीत या युद्धावर चर्चा झाली. तसेच, भारताने दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहनदेखील केले.
15 लाख+ नागरिकांचे पलायनसंयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) म्हणाले की, युक्रेनमधील परिस्थिती सतत बिघडत आहे. मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या अकरा दिवसांत 15 लाखांहून अधिक निर्वासितांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि आगामी मानवतावादी संकटाकडे आपण तातडीने लक्ष द्यायला हवे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच हाताळता येईल, असे ते म्हणाले.
PMने केले युद्ध थांबवण्याचे आवाहनतिरुमूर्ती पुढे म्हणाले, यूएनच्या अंदाजानुसार, या युद्धात आतापर्यंत 140 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या संघर्षात प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आमचे पंतप्रधान पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाशी बोलले आणि तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी पुन्हा संवादाच्या मार्गावर येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
20,000 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले
टीएस तिरुमूर्ती म्हणाले, आम्ही भारतीयांसह सर्व देशांतील नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाच्या आमच्या तातडीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही बाजूंकडून वारंवार आवाहन करुनही, सुमीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही. आम्ही इतर देशांतील नागरिकांनाही आपापल्या देशात परतण्यासाठी मदत केली आहे. एवढेच नाही तर आगामी काळातही असेच काम करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.
भारताची युक्रेन आणि शेजारील देशांना मदत तिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितले की, भारताने आधीच युक्रेन आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांना मानवतावादी मदत पाठवली आहे. यामध्ये औषधे, तंबू, पाणी साठविण्याच्या टाक्या, इतर मदत साहित्याचा समावेश आहे. आम्ही इतर गरजा ओळखून पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतीयांना घरी आणण्यासाठी 80 हून अधिक उड्डाणे उडत आहेत. युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी दिलेल्या मदतीची आम्ही प्रशंसा करतो.