Russia Ukraine War: 'आतापर्यंत 6000 रशियन मारले गेले', युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:38 PM2022-03-02T14:38:06+5:302022-03-02T14:38:15+5:30
Russia Ukraine War: 24 फेब्रुवारी ते 2 मार्च, या सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या 211 रणगाड्यांसह अनेक सैन्य वाहने नष्ट करण्यात आल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
कीव:रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. या सहा दिवसामध्ये रशियाने युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस केला आहे. तसेच, यात दोन्ही बाजुचे अनेक सैनिकही मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत रशियाचे 6 हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी बुधवारी केला.
बॉम्ब आणि हवाई हल्ल्यांने रशिया युक्रेनवर कब्जा करू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. बाबीन यारवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणतात की, या हल्ल्यावरुन हे सिद्ध होते की, रशियातील अनेक लोकांसाठी कीव हा परदेशी भाग आहे. या लोकांना कीवबद्दल काहीच माहिती नाही, त्यांना आपला इतिहास माहीत नाही. या लोकांना एकच आदेश आहे, तो म्हणजे युक्रेन आणि युक्रेनचा इतिहास नष्ट करावा.
रशियाचे मोठे नुकसान
24 फेब्रुवारी ते 2 मार्च या सहा दिवसांच्या युद्धात रशियाचे 211 रणगाडे नष्ट करण्यात आल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तर, 862 चिलखती वैयक्तिक वाहने, 85 तोफखान्याचे तुकडे आणि 40 एमएलआरएस नष्ट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, युद्धात रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत युक्रेनियन सैन्याने 30 रशियन विमाने आणि 31 हेलिकॉप्टर पाडल्याची माहिती मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, दोन जहाजे, 335 वाहने, 60 इंधन टाक्या आणि तीन यूएव्ही देखील खाली पाडण्यात आले. यावरुन युक्रेनचे सैन्य रशियाला कडवी टक्कर देताना दिसत आहे.
युक्रेनियन लोक रशियाशी लढत आहेत
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमधूनही मोठ्या संख्येने लोक पळून गेले आहेत. मात्र रशियाशी स्पर्धा करण्यासाठी अनेक जण युक्रेनमध्येच राहिले आहेत. काही लोक युक्रेन सोडून पूर्व हंगेरीला पोहोचले आहेत. येथील एका गावातील शाळेच्या मैदानात जमलेल्या शेकडो निर्वासितांपैकी बहुतांश महिला आणि मुले आहेत. त्यांचे पती, वडील, भाऊ आणि मुलगा आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आणि रशियन सैनिकांशी सामना करण्यासाठी युक्रेनमध्ये राहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.