Russia-Ukraine War: जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:02 PM2022-02-28T18:02:15+5:302022-02-28T18:10:30+5:30
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान अनेक दिलासा देणारे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत.
कीव: आज रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा पाचवा दिवस आहे. मागील पाच दिवसात रशियासोबतच्या युद्धात युक्रेनच्या नागरिकांच्या शौर्याच्या अनेक कहाण्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. रशियन टँकसमोर उभ्या असलेल्या युक्रेनियन नागरिकानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टँकविरोधी माइन हाताने उचलून रस्त्याच्या कडेला नेताना दिसत आहे.
टँकविरोधी माइन हातात उचलली
'द सन'च्या रिपोर्टनुसार, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर पडलेली अँटी-टँक माइन आपल्या हातात उचलून रस्त्यावरुन हटवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीच्या तोंडात सिगारेट आहे आणि तो एकदम शांतपणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती माइन उचलून बाजूला जंगलात ठेवत आहे.
A Ukrainian in Berdyansk spotted a mine on the road and didn't wait around for a bomb disposal unit - at great risk to life and limb, he removed the mine, clearing the way for the Ukrainian military. pic.twitter.com/iC9ZTrixlC
— The New Voice of Ukraine (@NewVoiceUkraine) February 27, 2022
युद्धादरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडिओने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या देशासाठी हा माणूस जीवाची पर्वा न करता माइन उचलतोय, यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती दिसत नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. या माइनवर युक्रेनचे सैनिक किंवा टँक आला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. त्याचा विचार करुन या व्यक्तीने हे कृत्य केले.
एकट्याने केला रशियन टँकचा सामना
याआधीही युक्रेनच्या एका नागरिकाचा टँकसमोर उभ्या असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हा माणूस रशियन सैनिकांच्या ताफ्याला थांबवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही व्यक्ती चक्त रशियन टँक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला पाच दिवस झाले असून युद्धाने जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात दोन्ही देशांनी चर्चेसाठी सहमती दर्शवली असून आता युद्ध थांबण्याची अपेक्षा आहे.