Russia-Ukraine War: 'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:33 PM2022-02-27T19:33:30+5:302022-02-27T19:33:41+5:30
Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युक्रेन परदेशी स्वयंसेवकांची "आंतरराष्ट्रीय" सेना तयार करत आहे.
कीव: रशियाने युक्रेनवर हल्ला करुन अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेनचा जास्त दिवस टिकावं लागणं अवघड आहे. अशा परिस्थितीत युक्रेन जमेल तिथून मदत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. याचाच भाग म्हणून युक्रेनने आता परदेशी नागरिकांना युक्रेनच्या सैन्यात सामील होऊन रशियाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युक्रेन परदेशी स्वयंसेवकांची "आंतरराष्ट्रीय" सेना तयार करत आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, झेलेन्स्की यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या देशासाठी तुमच्या समर्थनाचा हा प्रमुख पुरावा असेल.'' युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले की, युक्रेनच्या संरक्षणासाठी सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांनी आपापल्या देशांतील युक्रेनच्या राजनैतिक मिशनशी संपर्क साधावा.
Foreigners willing to defend Ukraine and world order as part of the International Legion of Territorial Defense of Ukraine, I invite you to contact foreign diplomatic missions of Ukraine in your respective countries. Together we defeated Hitler, and we will defeat Putin, too.
— Dmytro Kuleba (@DmytroKuleba) February 27, 2022
त्यांनी ट्विट केले, "युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय लष्कराच्या प्रादेशिक संरक्षणाचा भाग म्हणून युक्रेन आणि जागतिक व्यवस्थेचे रक्षण करू इच्छिणारे परदेशी नागरिक, मी तुम्हाला तुमच्या संबंधित देशांतील युक्रेनच्या परदेशी राजनैतिक मिशनशी संपर्क साधण्याचे निमंत्रण देतो. आपण तेव्हा हिटलरचा पराभव केला होता आता आपण पुतिनचाही पराभव करू."
युक्रेनने ठोठावला ICJ चाच दरवाजा
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग सातत्याने वाढताना दिसत आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. दरम्यान,युक्रेनने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. आता युक्रेनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्विट करत, युक्रेनने रशिया विरोधात आयसीजेकडे अर्ज केल्याचे म्हटले आहे.
रशियन बँकांना 'SWIFT' मधून काढण्याचा निर्णय
युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या विरोधात अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आणि भागीदारांनी बंदी घातलेल्या रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम 'स्विफ्ट'(SWIFT) मधून वेगळे करण्याचा आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि कॅनडाच्या नेत्यांनी शनिवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बंदी घातलेल्या रशियन कंपन्या आणि कुलीन वर्गाच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.