Russia Ukraine: डोनबासवर नियंत्रणाचे रशियाचे प्रयत्न अयशस्वी; युक्रेनचा तिखट प्रतिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 02:52 AM2022-04-24T02:52:58+5:302022-04-24T02:53:17+5:30
गेल्या चोवीस तासांत आठ हल्ले परतावून लावले, डोनेत्स्क व लुहान्स्क भागावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाने आपली ताकद पणाला लावली आहे.
कीव्ह : युक्रेनचा औद्योगिक प्रांत असलेल्या पूर्व डोनबासच्या भागावर संपूर्ण कब्जा करण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेन सैनिकांच्या तिखट प्रतिकारामुळे अद्याप यशस्वी झालेले नाहीत. हा भाग लवकर जिंकून घेता यावा यासाठी रशियाने काही लष्करी तुकड्या मारियुपोलमधून पूर्व युक्रेनमध्ये हलविल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत रशियाने केलेले आठ हल्ले युक्रेनने परतवून लावले.
डोनेत्स्क व लुहान्स्क भागावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाने आपली ताकद पणाला लावली आहे. या भागातून क्रिमियापर्यंत जाणारे सारे मार्ग आपल्या कब्जात असावेत अशी त्या देशाची इच्छा आहे. शत्रूचे नऊ रणगाडे, १३ लष्करी वाहने, तीन तोफा नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. पोपास्ना येथे रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोनजण ठार झाले. डोनेत्स्क व लुहान्स्कमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन एक ट्रेन स्लोवाकिया व हंगेरी या देशांच्या सीमेजवळील युक्रेनच्या चोप या शहरात शनिवारी सुखरूप पोहोचली.
मारियुपोलवर संपूर्ण कब्जा केल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा युक्रेनच्या प्रतिकारामुळे खोटा ठरला आहे.
या शहरात अडकलेल्या महिला, मुले, वयोवृद्ध यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे युक्रेनच्या सैनिकांनी केलेले प्रयत्न रशियाच्या अडवणुकीमुळे पुन्हा फोल ठरले आहेत. रशियाने मारियुपोलहून पूर्व युक्रेनच्या अन्य भागांत लष्कराच्या काही तुकड्या हलविल्या आहेत तसेच हल्ल्यांतही वाढ केली आहे.
संरक्षण सामग्रीसाठी भारताने रशियावर विसंबून राहू नये -अमेरिका
वॉशिंग्टन : संरक्षण सामग्रीसाठी भारताने रशियावर विसंबून राहू नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पेन्टॅगॉनचे प्रसारमाध्यम सचिव जॉन किर्बे यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेला युरोपीय देशांचीही सहमती आहे. युक्रेनच्या युद्धाचा भारताने अद्याप शब्दांत निषेध केलेला नाही, असा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला होता. अमेरिका, युरोपने घातलेल्या निर्बंधांचा फटका रशियातील संरक्षण उद्योगाला बसला आहे. त्याची झळ भारतालाही सोसावी लागेल, असा अमेरिकेचा दावा आहे. भारताची संरक्षण सामुग्रीची गरज पुरविण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वीही सांगितले होते.