स्मार्टफोन जगभरातील अनेक सामाजिक समस्यांसाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. किशोरवयीन मुलांचा एकाकीपणा, रस्ते अपघात तसेच अनेक प्रकारच्या आजारपणांसाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा करण्यात येत असतो. मात्र आता युद्धामध्येस्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले. याचं ताजं उदाहरण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामधून दिसून आलं आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२३ रोजी मकिव्हमधील एका बराकीला केवळ एका रॉकेटने लक्ष्य करण्यात आले. त्यात शेकडो रशियन सैनिकांचा मृत्यू झाला, असा दावा युक्रेनने केला आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांना युक्रेनने कसे काय मारले? असा प्रश्न रशियन नागरिक अधिकारी आणि रशियन मीडियाला विचारत आहेत. दरम्यान, याचं अधिकृत उत्तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे सैनिक अधिकृत निर्बंधांचं उल्लंघन करून मोबाईल फोनचा वापर करत होते. त्यामुळे युक्रेनला त्यांचे लोकेशन समजले आणि त्यांनी या सैनिकांना लक्ष्य केले.
रशियन सैनिक गेल्या वर्षी युक्रेनमध्ये घुसल्यापासून मोबाईल फोन्सचा वापर फोन लावण्यासाठी करत होतेच. त्याचबरोबर सातत्याने इंटरनेटचा वापर करू सोशल मीडियावरही सक्रिय होते. यामुळे रशियन सैनिकांसमोर ही समस्या निर्माण झाली हे. मात्र केवळ रशियनच नाही तर संपूर्ण जगातील सैन्यदले या समस्येचा सामना करत आहेत. युद्धादरम्यान रशियन सैन्य असुरक्षित कम्युनिकेशनवर अधिक विसंबून असल्याची माहिती समोर आली होती. मात्र बहुतांश रशिनय युनिट्सकडे सुरक्षित रेडिओ इक्विपमेंट होते. तरीही बहुतांश सैनिक हे संभाषणासाठी खासगी फोनचा वापर करत होते. युक्रेनमध्ये घुसल्यानंतरही ही प्रक्रिया सुरू होती.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांना रशियन सैनिक हे खासगी फोन वापरत असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी आपल्या देशातील नेटवर्कमधून रशियाचे नंबर्स बंद केले. त्यानंतर अनेक रशियन सैनिकांनी युक्रेनच्या लोकांचे फोन हिसकावून ते वापरण्यास सुरुवात केले. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याला रशियन सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देणे सोपे झाले आहे. काही प्रकरणात युक्रेनने रशियन सैनिकांच्या कॉल्सवर झालेलं संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं. त्यामुळे त्यांची रणनीती उघड होऊ लागली.