Russia-Ukraine War: यूक्रेनचा दावा- 'एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यासह रशियाचे अनेक सैनिक मारले गेले'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:29 PM2022-03-04T14:29:50+5:302022-03-04T14:30:25+5:30
Russia-Ukraine War: युक्रेन्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे.
कीव: गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. दरम्यान, रशियाला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान युक्रेनच्या लष्कराला हे यश मिळाले आहे. रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, मात्र रशियाने याला दुजोरा दिलेला नाही. युक्रेनने देखील मोठ्या संख्येने रशियन सैनिक मारले असल्याचे सांगितले आहे, परंतु रशियन बाजूने कोणतीही पुष्टी झालेली नाही. ब्रिटनचे वृत्तपत्र 'मेल ऑनलाइन'च्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सुखोवेत्स्कीच्या मृत्यूची पुष्टी केली नाही. मात्र त्यांचे सहकारी लष्करी अधिकारी सर्गेई चिपिलिओव्ह यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
मेजर जनरल सुखोवेत्स्की यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आतापर्यंत आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याचा इन्कार करत आला आहे. मात्र, एक दिवस आधी त्यांनी कबूल केले होते की, आतापर्यंत त्यांचे 498 जवान शहीद झाले आहेत, तर 1600 जखमी झाले आहेत. तर, युक्रेनच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळपास 9,000 सैनिकांना ठार केले आहे. पण, या आकडेवारीची पुष्टी करणे कठीण आहे.
सुखोवोत्स्की हे गेल्या वर्षीच डेप्युटी आर्मी कमांडर झाले
सुखोवोत्स्की हे रशियन सैन्यात अत्यंत प्रभावशाली अधिकारी होते. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना 41व्या तुकडीचे उप आर्मी कमांडर बनवण्यात आले. याआधी ते नोव्होरोसिस्कमधील 7व्या एअरबोर्न असॉल्ट डिव्हिजनचे 3 वर्षे कमांडर होते. सीरिया, चेचन्या आणि अबखाझिया येथील अनेक लढायांमध्ये त्यांनी रशियन सैनिक आणि लढवय्यांचे आघाडीवर नेतृत्व केले होते. त्यांना ऑर्डर ऑफ मिलिटरी मेरिट आणि मेडल ऑफ करेज यासारख्या सर्वोच्च शौर्य पदकांनीही त्यांचा गौरव करण्यात आले.