Russia-Ukraine War: 11 वर्षीय युक्रेनियन मुलाच्या हिमतीला सलाम, जीव वाचवण्यासाठी एकट्याने केला 1000 किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:51 AM2022-03-07T11:51:15+5:302022-03-07T11:52:33+5:30
Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. यामुळे आता युक्रेनमध्ये राहणारे लाखो लोक शेजारील देशांमध्य आश्रय घेत आहेत.
कीव: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. युक्रेनमधील अनेक लोक भीतीमुळे इतर देशांमध्ये आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने स्थलांतर करत आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांत दहा लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले आहेत. यातच एका 11 वर्षीय युक्रेनियन मुलाच्या हिमतीला सर्वजण सलाम करत आहेत. हा मुलगा जीव वाचवण्यासाठी एकट्याने तब्बल 1,000 किमी प्रवास करुन स्लोव्हाकियाला पोहोचला. त्याच्याकडे फक्त एक पिशवी, आईची चिठ्ठी आणि दूरध्वनी क्रमांक होता.
'सर्वात मोठा नायक'
सविस्तर माहिती अशी की, 11 वर्षीय मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झ्याचा रहिवासी होता. गेल्या आठवड्यात या भागावर रशियाने ताबा मिळवला आहे. रशियाच्या ताब्यानंतर हा मुलगा जीव वाचवण्यासाठी एकटा निघाला, आजारी नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी त्याच्या पालकांना युक्रेनमध्ये राहावे लागले. हा एक हजार किमीचा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर मुलाने त्याच्या निर्भयपणा आणि दृढनिश्चयासाठी खूप प्रशंसा मिळवली. स्लोव्हाकियाच्या मंत्रालयाने फेसबुक पोस्टमध्ये मुलाला "काळरात्रीचा सर्वात मोठा नायक" म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे नातेवाईक स्लोव्हाकियामध्ये राहतात. मुलाच्या आईने त्याचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. पालकांना मुलासोबत जाता येत नव्हते, म्हणून आईने अकरा वर्षीय मुलाला स्लोव्हाकियाच्या रेल्वेत बसवले. या प्रवासात त्याच्यासोबत एक प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि एका चिठ्ठीत संदेश आणि नातेवाईकाचा फोन नंबर होता. मुलगा जेव्हा स्लोव्हाकियामध्ये दाखल झाला, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील फोन नंबरच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
अन् मुलाच्या राहण्याची सोय झाली
मुलाच्या आईने त्याची काळजी घेतल्याबद्दल स्लोव्हाकिया सरकार आणि पोलिसांचे आभार मानले. स्लोव्हाकियाच्या गृह मंत्रालयाने फेसबुक पोस्ट करुन मुलाच्या "निर्भयपणा आणि दृढनिश्चयाचे" कौतुक केले. दरम्यान, सध्या मुलाला काही स्वयंसेवकांनी आपल्यासोबत नेले असून, त्याची खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता लवकरच मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पाठवले जाईल.