युक्रेनला आता युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. सारी शहरे उद्ध्वस्त झालेली असताना आता नागरिकांनाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. एका अल्पवयीन मुलीवर पाच रशियन सैनिकांनी बलात्कार केला होता. ती प्रेग्नंट राहिली आहे. त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे तिला ते मुल जन्माला घालावे लागणार आहे.
जर या १४ वर्षीय मुलीचा गर्भपात केला तर ती पुन्हा कधीच प्रेग्नंट राहू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे तिच्यावर असे अपत्य जन्माला घालण्याची वेळ ओढवली आहे. मिरर यूकेने याची माहिती दिली आहे. ही मुलगी बुचा शहरात राहणारी आहे. तिची ही कहानी मनोविकार तज्ज्ञ ऑलेक्ज़ेंड्रा क्वित्को (Oleksandra Kvitko) यांनी जगासमोर मांडली आहे. तिला क्वित्को या मार्गदर्शन करत आहेत.
क्वित्को या रशियन सैनिकांच्या वासनेला बळी पडलेल्या १४ ते १८ वयोगटातील पाच मुलींची मदत करत आहेत. या मुली रशियन सैनिकांनी बलात्कार केल्यानंतर प्रेग्नंट राहिल्या आहेत. एक १० वर्षांची मुलगीही गर्भवती राहिली आहे. त्यांनी युक्रेन युद्धानंतर अनेक तरुणी, महिला रशियन सैनिकांपासून प्रेग्नंट राहणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. रशियन सैनिकांनी लहान मुलांनाही आपले शिकार बनविले आहे, असा आरोप त्यांनी केला.
बुचामध्ये १४ ते २४ वर्षे वयोगटातील २५ मुलींवर बलात्कार झाल्याचा दावा मानवाधिकार लोकपाल ल्युडमिला डेनिसोवा यांनी केला आहे. त्यापैकी अनेक मुली प्रेग्नंट झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.