कीव्ह : युक्रेनमध्ये युद्धात आतापर्यंत १,४०० नागरिक ठार झाले असून, २ हजारांहून अधिक जण जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने म्हटले आहे. कीव्ह परिसरात युक्रेनच्या शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. रशियाने युक्रेन नागरिकांचे हत्याकांड केल्याचा आरोप असून, या युद्ध गुन्हेगारीची युक्रेन चौकशी करणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांची मदत घेण्यात येईल.
युद्धाच्या ४०व्या दिवशी रशियाचे सैन्य कीव्ह परिसरातून आणखी मागे नेण्यात आले. त्यामुळे ते भाग युक्रेन लष्कर पुन्हा ताब्यात घेत आहे. तिथे रशियाच्या लष्कराने ठार मारलेल्या नागरिकांचे मृतदेह सापडत आहेत. त्यापैकी अनेकांचे हात बांधून त्यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या हत्याकांडांचा युक्रेनने निषेध केला आहे. कीव्ह परिसरात आतापर्यंत युक्रेनच्या ४१० नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत.
जगाने युद्ध गुन्हेगारीच्या अनेक घटना आजवर पाहिल्या असतील. मात्र, रशियाच्या लष्कराने युक्रेनमध्ये केलेले अत्याचार सर्वात भीषण आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे. मात्र युक्रेनमध्ये आम्ही कोणतेही हत्याकांड केलेले नाही, असे रशियाने स्पष्ट केले. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवावी, असेही म्हटले आहे.
संगीतक्षेत्राने युक्रेनला पाठिंबा द्यावा : जेलेन्स्कीरशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची व तिथे केलेल्या हत्याकांडाची कहाणी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सांगितली जावी व सर्वांनी युक्रेनला पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केले. त्यांचा हा व्हिडिओ संदेश ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रविवारी दाखविण्यात आला.युक्रेन युद्धामुळे भयाण शांतता पसरली आहे. ती पोकळी तुमच्या संगीताने भरून काढावी, असे आवाहनही जेलेन्स्की यांनी संगीतकार, गायक आणि गायिकांना केले आहे.
बुकामध्ये दफनविधीसाठी ४५ फूट खोल खड्डा, समाज माध्यमावरील छायाचित्राने लोक हळहळलेबुका : युक्रेनमध्ये कीव्ह शहराच्या परिसरातील बुका या भागात रशियाच्या लष्कराने ठार केलेल्या नागरिकांचे सामुदायिक दफन करण्यासाठी एका चर्चच्या आवारात ४५ फूट खोल मोठा खड्डा खणण्यात आला आहे. त्याचे एका उपग्रहाने काढलेले छायाचित्र समाज माध्यमांवर झळकले असून त्यामुळे असंख्य जण हळहळले आहेत.बुकामधून रशियाचे सैन्य माघारी गेल्यानंतर त्या भागाचा पत्रकारांनी दौरा केला. त्यावेळी बुकामध्ये रस्त्यांवर टाकून दिलेले मृतदेह आढळून आले. शेकडो नागरिकांच्या मृतदेहांचे दफन करण्यासाठी बुका येथे खणण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्याचे छायाचित्र अमेरिकेच्या मॅक्सर टेक्नॉलॉजीज या कंपनीने समाज माध्यमांवर झळकविले. या परिसरात रशियाच्या लष्कराने किती मोठे अत्याचार केले असतील याची कहाणीच सामुदायिक दफनविधीची ही जागा सांगत आहे, अशा प्रतिक्रिया त्यावर नेटकऱ्यांनी दिल्या.बुका येथील एका रहिवाशाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, रशियाचे सैनिक प्रत्येक इमारतीत शिरायचे. त्या इमारतीच्या तळघरांमध्ये आश्रय घेतलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढायचे. त्यांचे मोबाइल तपासले जायचे. या फोनमध्ये रशियाच्या लष्कराविरोधातील छायाचित्रे किंवा मजकूर असेल तर तो नष्ट केला जायचा. त्यानंतर या नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मारियुपोलमधीलस्थिती आणखी बिकटयुक्रेन व रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला मारियुपोल शहर व तसेच इतर ठिकाणी रशियाने हल्ले सुरूच ठेवले आहेत. मारियुपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांची रशियाच्या लष्कराने आणखी कोंडी केली आहे.