Russia Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू, युक्रेनच्या दाव्यानंतर रशियाने सांगितला अधिकृत आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:01 PM2022-03-03T12:01:45+5:302022-03-03T12:06:34+5:30
Russia Ukraine War: सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या सहा हजार सैनिकांना मारल्याचा तसेच अनेक रशियन विमानांना पाडल्याचा दावा युक्रेनने केला होता. हा दावा आता रशियाने फेटाळून लावला असून, युद्धात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडाही जाहीर केला आहे.
मॉस्को - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दरम्यान, पहिल्या सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या सहा हजार सैनिकांना मारल्याचा तसेच अनेक रशियन विमानांना पाडल्याचा दावा युक्रेनने केला होता. हा दावा आता रशियाने फेटाळून लावला असून, युद्धात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडाही जाहीर केला आहे.
रशियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युक्रेनविरुद्धच्या सैनिकी कारवाईमध्ये आतापर्यंत ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५९७ सैनिक जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या लष्करी कारवाईचा हेतू हा युक्रेनचे विमुद्रीकरण करणे हा आहे. दरम्यान, रशियाने त्यांच्या मृत सैनिकांचा सांगितलेला आकडा हा युक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यापेक्षा फारच कमी आहे. युक्रेनने रशियाचे ६ हजार सैनिक मारल्याचा दावा केला होता.
सद्यस्थितीत रशियाने युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई तीव्र केली आहे. तसेच लवकरात लवकर युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हवर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. तर भयंकर संघर्षानंतर युक्रेनमधील मोठे शहर असलेले खारकिव्ह रशियाच्या नियंत्रणात आले आहे. तर किव्हला ताब्यात घेण्यासाठी घनघोर संघर्ष होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अमेरिकन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रशियन सैन्य या युद्धात आपल्या लक्ष्यापासून अद्याप बरेच दूर आहे. त्यांचे सैनिक अजूनही किव्हच्या बाहेर आहेत. त्यांना सातत्याने युक्रेनच्या जनतेचा सामना करावा लागत आहे. तसेच रशियन सैनिकांकडे अन्न आणि इतर साधनसामुग्रीची टंचाई आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.