युक्रेनची राजधानी कीववर चाल करून जाणाऱ्या रशियन सैन्याच्या लांबलचक ताफ्यामुळे जग हादरले होते. परंतू गेले चार-पाच दिवस झाले हा ताफा जागच्या जागीच थांबलेला आहे. काय झालेय कोणालाच काही कळायला मार्ग नाहीय. NEXTA या वृत्तवाहिनीने यासंबधी वृत्त दिले आहे.
रशियाने कीवमध्ये सैन्य घुसल्याचा दावा केला आहे. परंतू, रशियन मिलिट्रीच्या वाहनांचा झालेला विद्ध्वंस युक्रेनमध्ये दिसत आहे. रशियाने कीववर हल्ला करण्यासाठी व ताब्यात घेण्यासाठी ६४ किमी लांब रणगाडे, बुलेटप्रूफ गाड्या आणि ट्रक भरून सैन्य आणि शस्त्रांचा ताफा कीवकडे पाठविला होता. याचा फोटो व्हायरल झाला तेव्हापासून सर्वांनाच धडकी भरली होती. एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य कीववर आक्रमण करणार मग युक्रेन सैनिकांचा निभाव कसा लागणार असे वाटत होते. परंतू हा ताफा जागेवरच असल्याने नेमके काय घडलेय असा प्रश्न आता पडू लागला आहे. एकतर या वाहनांना बर्फवृष्टीमुळे निर्माण झालेल्या चिखलांचा सामना करावा लागला असेल किंवा त्यांचे इंधन संपले असेल असा अंदाज लावला जात आहे.
याचबरोबर रशियन सैन्य जेव्हापासून युक्रेनमध्ये घुसलेय तेव्हापासून त्यांना अन्न पाणी, शस्त्रे आणि इंधनाची रसद मिळत नाहीय. पहिल्या दिवसापासून हे सैन्य बेजार झालेले आहे. त्यामुळे अनेक सैनिकांनी युद्धास नकार देत शस्त्रे, वाहने युक्रेन सैन्याकडे सोपविल्याचेही दावे केले जात आहेत. दुसरी बाब म्हणजे युक्रेनने पुन्हा रशियाच्या सीमेवरील शहरांवर ताबा मिळविल्याने रशियन फौजांची रसद बाधीत झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
रशियाने कालपासून कीववर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली असून मिसाईल हल्ल्यांवर रशियाचा भर आहे. काल काही तासांत काही डझनांवर मिसाईल हल्ले करण्यात आहे. यामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या नागरिकांना संबोधित करताना कदाचीत हे माझे अखेरचे बोलणे असेल असेही म्हटले होते. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने तातडीने हालचाली करत जेलेन्स्की यांना सुरक्षित करण्यासाठी कमांडो पाठविल्याचा दावा रशियाने केला आहे. जेलेन्स्की यांना युक्रेनमधून बाहेर नेले जाण्याची शक्यता आहे.