रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण ६०० मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास ९५ टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे.
रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे. याचदरम्यान युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विटरद्वारे एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटरवर एका बॉम्बचे छायाचित्र पोस्ट केले आहे आणि असे म्हटले आहे की, अशा बॉम्बमुळे युक्रेन देशातील लोकांचा जीव जात आहे. यासोबतच युक्रेनला लढाऊ विमान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. चेर्निव्हमधील एका घरावर हा भीषण ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब पडला आहे. पण तो फुटला नाही. अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत, ज्यामध्ये निष्पाप पुरुष, महिला आणि लहान मुलं मारली जात आहेत, असं
युक्रेनमध्ये रविवारी मारियुपोल येथील दुसरा युद्धविरामदेखील अयशस्वी ठरला. शहरात रशियाने हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. काल रशियाने खारकीव्ह व अन्य शहरांवरही जोरदार हल्ले चढवले. या माऱ्याच्या तीव्रतेमुळे युक्रेनमधील गॅस यंत्रणेची १६ गॅस पुरवठा केंद्रे बंद करण्यात आली. कनिव येथील जलविद्युत निर्मिती केंद्रावर कब्जा करण्यावर रशियाने आता लक्ष केंद्रित केले आहे.
नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात चर्चा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात-
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात आहे. युक्रेनमधून आतापर्यंत १६ हजाराहून अधिक भारतीय परतले आहेत. आज ८ विमाने पाठविण्यात आले असून, १५०० भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. रविवारी ११ विमानांमधून २१३५ भारतीय परतले.