किव्ह - रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने आता भीषण रूप धारण केले आहे. रशियन लष्कराचे आक्रमण, क्षेपणास्त्र हल्ले, बॉम्बहल्ले यांनी युक्रेनमधील शहरे होरपळून निघत आहेत. मात्र असं असूनही युक्रेनने अद्याप हार मानलेली नाही. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन युनियनच्या संसदेला संबोधित करताना ऐतिहासिक विधान केले. आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय आणि त्याची किंमत आमच्या नागरिकांना मोजावी लागत आहे. तसेच आम्हाला सर्व देशांकडून पाठिंबा मिळत आहे. झेलेन्स्की यांचे संबोधन पूर्ण झाल्यानंतर युरोपियन युनियनच्या सदस्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
झेलेन्स्की म्हणाले की, ही माझ्यासाठी, प्रत्येक युक्रेनी नागरिकासाठी, आमच्या देशासाठी एक मोठी आपत्ती आहे. मला आनंद आहे की, आम्ही आज तुम्हा सर्वांना, युरोपियन युनियनच्या देशांना एकजूट केले आहे. मात्र मला हे माहिती नव्हते की, याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल.
दरम्यान, युक्रेन आणि रशियातील संघर्षात दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. एकीकडे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर रशियाचे टँक, हेलिकॉप्टर आणि विमाने पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. तसेच रशियाचे सुमारे पाच हजार सैनिक आतापर्यंत मारले गेल्याचे किंवा जखमी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.